शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा कठोर कारवाई; अमित शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 05:39 IST2024-12-16T05:39:24+5:302024-12-16T05:39:38+5:30
शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी सरकारची

शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा कठोर कारवाई; अमित शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा
जगदलपूर : शस्त्रं सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी नक्षलवाद्यांना इशारा दिला. शरण गेलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
छत्तीसगडच्या जगदलपूर येथील कार्यक्रमात ते म्हणाले की, मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होईल. मी नक्षलवाद्यांना आवाहन करतो, कृपया पुढे या. शस्त्र सोडा, शरण या आणि मुख्य प्रवाहात या. तुमचे पुनर्वसन ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही शरण येऊन मुख्य प्रवाहात आलात तर तुम्ही छत्तीसगड आणि भारताच्या विकासासाठी योगदान द्याल.
बस्तरमधील नक्षलवाद संपला, तर येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे काश्मीरपेक्षा अधिक पर्यटक या भागाकडे आकर्षित होतील. बस्तरच्या विकासाची नवी गाथा यामुळे लिहिली जाईल आणि नक्षलवादाच्या पूर्ण निर्मूलनाचा मजबूत पाया तयार होईल, असेही शाह म्हणाले.
नक्षलवादाचा नायनाट सुरू : शाह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या काळात माओवाद्यांविरुद्धची कारवाई मंदावली होती. पण, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २८७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले, ९९२ जणांना अटक करण्यात आली आणि ८३६ जण शरण आले. मोदी सरकारच्या काळात सुरक्षा दलातील मृत्यू ७३ टक्क्यांनी, तर नागरिकांच्या मृत्यूत ७० टक्क्यांची घट झाली आहे.