उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. लग्नाची वरात घेऊन जाणारी एक कार अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली, ज्यामध्ये नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू झाला. तसेच नवरदेवासह पाच जण गंभीर जखमी झाले. चिल्ला पोलीस स्टेशन हद्दीतील पपरेन्दा गावाजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची वरात हमीरपूरमधील सुमेरपूरला जात होती. गाडीत नवरदेवासह एकूण सात लोक होते. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा ड्रायव्हर हा दारुच्या नशेत होता आणि गाडी चालवताना तो त्याच्या मोबाईलवर सोशल मीडियावरील रील पाहत होता. पपरेन्दा गावात पोहोचताच स्विफ्ट कार अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी नवरदेवाच्या भाचीला मृत घोषित केलं इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. लग्न घरात अपघाताची माहिती मिळताच सर्वांना मोठा धक्का बसला.
डीएसपी राजीव प्रताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात चालकाचा निष्काळजीपणा आणि नशेमुळे हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे. यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.