VIDEO: "तुम्हाला अक्कल आहे की नाही?"; महिला जिल्हाधिकाऱ्याला महसूल मंत्र्यांनी सर्वासमोर सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:49 IST2025-01-25T15:49:09+5:302025-01-25T15:49:26+5:30

तेलंगणामध्ये एका मंत्र्याने महिला अधिकाऱ्याला सर्वांसमोर खडेबोल सुनावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dont you have common sense Telangana Revenue Minister lashes out at IAS officer | VIDEO: "तुम्हाला अक्कल आहे की नाही?"; महिला जिल्हाधिकाऱ्याला महसूल मंत्र्यांनी सर्वासमोर सुनावलं

VIDEO: "तुम्हाला अक्कल आहे की नाही?"; महिला जिल्हाधिकाऱ्याला महसूल मंत्र्यांनी सर्वासमोर सुनावलं

Telangana Minister: तेलंगणाचे महसूल मंत्री पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तेलंगणाचे महसूल मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी वादात सापडले आहेत. या व्हिडिओमध्ये पोंगुलेटी एका महिला आयएएस अधिकाऱ्याला फटकारताना दिसत आहे. कार्यक्रमाच्या मध्यभागी ते अनेक लोकांसमोर महिला आयएएस अधिकाऱ्यावर आपला राग काढताना दिसत आहे. मंत्र्यांच्या या वागणुकीवरुन त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात आहे. बीआरएस पक्षाने रेड्डी यांच्या या कृतीसाठी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

शुक्रवारी करीमनगरमध्ये झालेल्या शासकीय कार्यक्रमादरम्यान पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी यांनी जिल्हाधिकारी पामेला सत्पथी यांना सर्वांसमोर खडसावले आणि त्यांना फटकारले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टरही उपस्थित होते, ते करीमनगरमध्ये विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी कार्यक्रमात प्रोटोकॉलबाबत गडबड झाल्याने मंत्री रेड्डी संतप्त झाले आणि त्यांनी सर्वांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना फटकारले.

शुक्रवारी तेलंगणातील करीमनगर येथे आयोजित एका सरकारी कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला. यावेळी कार्यक्रमादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याने मंत्री पोंगुलेटी यांचा संयम सुटला. त्यांनी सर्वासमोर करीमनगरच्या जिल्हाधिकारी पामेला सातपती यांना झापलं. पोंगुलेटी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना  "तुम्ही काय करताय? तुम्हाला अक्कल नाही का?" असं म्हटलं.यानंतर महिला जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्र्यांची नाराजी कमी झाली नाही. मंत्री पोंगुलेटी बराच वेळ जिल्हाधिकाऱ्यांना सुनावत राहिले.

या घटनेचा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. मंत्र्यांच्या या कृतीवर नेत्यांसह सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बीआरएस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या कविता यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि या घटनेला लज्जास्पद आणि म्हटले.

"काँग्रेस नेत्यांच्या उद्दामपणाचे हे स्पष्ट उदाहरण असून अशी अपमानास्पद वागणूक मान्य नाही. हा केवळ जिल्हाधिकाऱ्यांचाच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचा अपमान आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. काँग्रेस पक्षाने तात्काळ त्यांची माफी मागावी," असे कविता राव यांनी म्हटलं.

Web Title: Dont you have common sense Telangana Revenue Minister lashes out at IAS officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.