भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला होता. या गोळीबारात नियंत्रण रेषेजवळच्या अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्यात पुंछमध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे जात पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी काही शालेय विद्यार्थ्यांशीही संवाद साधत राहुल गांधी यांनी त्यांना धीर दिला.
यावेळी राहुल गांधी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही धोका आणि भयावह परिस्थिती पाहिला आहे. मात्र काळजी करू नका, सारंकाही ठीक होईल. या आव्हानाचा सामना करायचा असेल तर तुम्ही खूप शिका, खूप खेळा आणि शाळेमध्येही खूप मित्र बनवा.
राहुल गांधी यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबद्दल काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्दा यांनी सांगितले की, सर्वाधिक नुकसान हे पुंछमध्ये झालं आहे. राहुल गांधी यांनी या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या नुकसान झालेल्या घरांचीही पाहणी केली.
दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान ७ ते ९ मेदरम्यान, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबार, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात एकट्या पुंछमध्ये ७० हून अधिक लोक जखमी झाले होते. हजारो लोकांना नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळच्या क्षेत्रातून पलायन करून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला होता. चार दिवस चाललेल्या या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानने १० मे रोजी युद्धविराम घोषित केला होता.