‘ओरडू नका! ही चौक सभा नाही, न्यायालय आहे’, सरन्यायाधीश चंद्रचूड कुणावर भडकले, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 18:15 IST2024-03-18T18:15:01+5:302024-03-18T18:15:47+5:30
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्टोरल बाँडबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पारा चढला. सोमवारी त्यांनी प्रक्रियेचं योग्ल पालन करणाऱ्या वरिष्ठ वकिलांना सरन्यायाधीशांनी खडसावले.

‘ओरडू नका! ही चौक सभा नाही, न्यायालय आहे’, सरन्यायाधीश चंद्रचूड कुणावर भडकले, नेमकं काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्टोरल बाँडबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पारा चढला. सोमवारी त्यांनी प्रक्रियेचं योग्ल पालन करणाऱ्या वरिष्ठ वकिलांना सरन्यायाधीशांनी खडसावले. सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी सरन्यायाधीशांच्या कोपाचे शिकार झाले. त्यानंतर ॲडव्होकेट मॅथ्यूज नेदुम्परा यांनी चढ्या आवाजात संभाषण केल्याने सरन्यायाधीश संतापले. सरन्यायाधीशांनी मॅथ्यूज यांना कठोर शब्दात सांगितले की, माझ्यावर ओरडू नका. हे न्यायालय आहे कुठली सभा नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश अग्रवाल यांनाही सरन्यायाधीशांच्या कोपाचा प्रसाद मिळाला. या तिन्ही वकिलांची खरडपट्टी काढत कोर्टाने या प्रकरणार आदेश दिला.
आज सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर मुकुल रोहतगी यांनी उभे राहून सांगितले की, ते FICCI आणि ASSOCHAM कडून हजर होत आहेत आणि त्याबाबतचं निवेदन दाखल केलं आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, मला असं कुठलंही निवेदन मिळालेलं नाही. त्यानंतर रोहतगी काहीतरी बोलले. त्यावर सरन्याधीश म्हणाले की, तुम्ही निर्णय झाल्यानंतर आला आहात. आता आम्ही तुमचं म्हणणं आताच ऐकू शकत नाही.
मुकुल रोहतगी यांच्यानंतर त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या ॲडव्होकेट मॅथ्यूज नेदुम्परा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी सांगितलं की, संपूर्ण निर्णय हा नागरिकांना अंधारात ठेवून सुनावण्यात आला. त्यावेळी सरन्यायाधीशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेवढ्यात सरन्यायाधीशांनीही कठोर भाषा वापरण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, माझ्यावर ओरडू नका. ही काही कुठली चौक सभा नाही. कोर्ट आहे. जर तुम्हाला निवेदन पुढे आणायचं असेल तर निवेदन दाखल करा. हेच आम्ही मुकुल रोहतगी यांनाी सांगितलं आहे. मात्र सरन्यायाधीशांचं म्हणणं ऐकल्यानंतरही नेदुम्परा गप्प बसले नाहीत. तेव्हा न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी तुम्हाला कोर्टाचा अपमान केल्याची नोटिस हवी आहे का? असे परखड शब्दात विचारले.
या दोन वकिलांनंतर व्हिीडओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून हजर झालेले एसएसीबीएचे अध्यक्ष आदिश अग्रवाल यांनी वादात उडी घेतली. त्यांनी सुओ मोटो रिह्यूसाठीच्या आपल्या याचिकेला उल्लेख केला. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी इशारा देताना सांगितले की, ‘’मिस्टर अग्रवाल, तुम्ही एक वरिष्ठ वकिल आहात, सोबतच एससीबीएचे अध्यक्षही आहात. तुम्हाला प्रक्रिया माहिती असली पाहिजे. तुम्ही मला एक पत्र लिहिलंय, हे सर्व पब्लिसिटीसाठी आहे. आम्ही त्याला परवानगी देणार नाही. त्या मुळे हे कृपया तिथेच ठेवा. नाहीतर मला असं काही सांगावं लागेल जे अप्रीय असेल’’.