भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे, पण मुदत संपली तरी सीमा हैदरने देश सोडला नाही. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. तिला परत पाठवण्याबद्दल बोललं जात आहे. तिला परत का पाठवलं जात नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या मिनाक्षी भराला यांनी सीमा हैदरची बाजू घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बागपत येथे माध्यमांशी बोलताना राज्य महिला आयोगाच्या सदस्या मिनाक्षी भराला म्हणाल्या की, 'माहिती नाही की, सीमा हैदरला इतकी प्रसिद्धी दिली जाते. मला कधीच हे कळलं नाही की, ती सतत प्रसिद्धीमध्ये कशी राहते. तिने कायदेशीरपणे लग्न केलं आहे. तिला मुलंही आहेत.'
'मला वाटतं की, आता ती भारतात आलीच आहे आणि ती व्यवस्थित राहत आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग करत नाहीये. तर तिला परत पाठवायला नको. राहिला सरकारचा प्रश्न तर ते सरकार ठरवले की, तिच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे', असे मिनाक्षी भराला म्हणाल्या.
सीमा हैदर २०२३ मध्ये अवैधपणे पाकिस्तानातून भारतात आली होती. ती नेपाळमार्गे भारतात आली होती. भारतात आल्यानंतर सीमा हैदरने ग्रेटर नोएडातील सचिन मीणा याच्यासोबत लग्न केले.
सीमा हैदर पाकिस्तानात का गेली नाही?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि त्यांना भारतात परतण्याचे आदेश दिले. 29 एप्रिलपर्यंत नागरिकांना वेळ देण्यात आला होता. ५३७ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. यात पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील ९ उच्चायुक्त आणि अधिकारी यांचाही समावेश आहे.
भारताने १४ प्रकारच्या व्हिसावर भारतात आलेल्यांना पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले. पण, सीमा हैदर कोणत्याही व्हिसा आधारे भारतात आली नव्हती. ती अवैध मार्गाने भारतात आली आणि तिने सचिन मीणा याच्यासोबत लग्न केले. भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी तिने अर्जही केला आहे. तो राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे तिच्या संदर्भात आता सरकार काय निर्णय घेणार, हा मुद्दा आहे.