इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:19 IST2025-12-28T12:18:46+5:302025-12-28T12:19:45+5:30
मुद्द्याची गोष्ट : बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या घटना केवळ अंतर्गत अस्थिरतेचे लक्षण नाहीत, तर त्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी थेट जोडलेल्या आहेत. १९७१ मध्ये भारताच्या निर्णायक हस्तक्षेपातून जन्माला आलेल्या बांगलादेशात आज भारतविरोधी आणि अल्पसंख्याकविरोधी वातावरण बळावत आहे.

इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
कर्नल (निवृत्त) विनायक तांबेकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक -
बांगलादेशातहिंदू व्यक्तींवर अत्याचार, हिंसाचार अशा घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. त्याची दखल भारत सरकारला घ्यावी लागेल. कारण, बांगलादेशाचे भौगोलिक स्थान आाणि तेथील राजकीय परिस्थिती. बांगलादेशाची निर्मिती ही भारत सरकारने १९७१ मध्ये केली, हे निर्विवाद ऐतिहासिक सत्य आज तेथील मुस्लीम जनतेच्या स्मृतीतून पुसले जात असल्याचे सध्याच्या घटनांवरून स्पष्ट होते. एकेकाळचा पूर्व पाकिस्तान हा भारताच्या नकाशावर काट्यासारखा रुतलेला होता. सुमारे १,४८,००० चौरस किमी क्षेत्रफळ आणि १७ कोटी लोकसंख्येचा हा प्रदेश भारताच्या फाळणीत झालेल्या मोठ्या राजकीय चुकीचे प्रतीक ठरला. त्या चुकीचे परिणाम भारताला दीर्घकाळ भोगावे लागले. अखेर १९७१ मध्ये भारताने धाडसी निर्णय घेत बांगलादेशाची निर्मिती केली. मात्र आज त्याच देशात भारतविरोधी सूर आणि अल्पसंख्याकविरोधी हिंसाचार वाढताना दिसत आहे, ही बाब भारतासाठी गंभीर चिंतेची आहे.
१९७१चे युद्ध आणि भारताने केलेला निर्णायक हस्तक्षेप -
१९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार आणि तत्कालीन लष्करी पूर्व विभागाचे लेफ्टनंट जनरल जगजीतसिंह अरोरा यांच्या उत्कृष्ट लष्करी योजनेनुसार अवघ्या १४ दिवसांत बांगलादेशाची निर्मिती झाली. ही घटना जागतिक लष्करी इतिहासात अभूतपूर्व ठरली. तब्बल ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली. ले. जनरल अरोरा यांनी तत्कालीन पूर्व पाकिस्तानचे लष्करी प्रमुख जनरल नियाझी यांच्याकडून शरणागतीपत्रावर सही घेतानाचे छायाचित्र जगभर गाजले. १६ डिसेंबर १९७१ हा दिवस आजही ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम मानेकशा यांनी केले.
बहुसंख्याकवाद आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले
१७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात सुमारे १५ कोटी मुस्लीम आहेत. या बहुसंख्येच्या बळावर हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या देवळांवर, चर्चवर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. यामागे युनूस यांच्या नेतृत्वाखालील अकार्यक्षम सरकार कारणीभूत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात शरीफ उस्मान हादी यांचा खून झाला. ही व्यक्ती पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांची विरोधक होती. तसेच हिंदू तरुण पुढारी दीपूचंद्र दास यांची हत्या ही बांगलादेशातील वाढत्या अराजकतेचे ठळक उदाहरण ठरते.
निवडणुका, सत्तासंघर्ष आणि भारताची चिंता
येत्या फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकांकडे भारतासह जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीकडून खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान उतरतो आहे. आवामी लीगविरुद्ध बीएनपी अशी थेट लढत अपेक्षित आहे.
तारिक रहमान गेली १०-१२ वर्षे जिवाला धोका असल्याने लंडनमध्ये वास्तव्यास होता. जिवाला धोका असल्यामुळे शेख हसीना भारतात, दिल्लीत राहत आहेत. त्यांच्या आवामी लीग पक्षावर बांगलादेशात बंदी आहे. त्यामुळे या निवडणुकीतून उदयास येणारे सरकार हिंदू आणि भारतविरोधी भूमिका घेते की नाही, याकडे भारताला सावध नजरेने पाहावे लागणार आहे.
सीमावर्ती राज्यांसमोरील गंभीर आव्हान
सुमारे १,४८,००० चौरस किमी क्षेत्रफळाचा बांगलादेश भारतासाठी आज डोकेदुखी ठरत आहे. तेथून आसाम व त्रिपुरा या राज्यांत होणारी घुसखोरी हा गंभीर प्रश्न बनला आहे. खोटे आधार कार्ड, रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे मिळवून स्थानिक रहिवासी असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. आसाम सरकारने या घुसखोरीविरोधात ठोस पावले उचलून अनेक प्रकरणे उघडकीस आणली. मात्र ही समस्या कायदा-सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून, ती भारताच्या अंतर्गत सुरक्षेला थेट आव्हान देणारी आहे.
- १७ कोटी लोकसंख्या बांगलादेशची आहे.
- १५ कोटी मुस्लीम बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येपैकी आहेत. या बहुसंख्येच्या बळावर हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या देवळांवर, चर्चवर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले.
- १४ दिवसांत बांगलादेशाची निर्मिती झाली.