लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतात आयफोन उत्पादने करू नका, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सल्ला ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी मानला, तर भारताला ॲपलच्या साडेचार लाख कोटींच्या गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागेल, तसेच सुमारे अडीच लाख रोजगारालाही मुकावे लागेल.
ॲपलने २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतात १.१६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, येत्या पाच वर्षांच्या काळात ३.३२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात झाले.
काय म्हणाले होते ट्रम्प?
ट्रम्प यांनी दोहा, कतार येथे सांगितले की, मी टिम कुक यांना म्हणालो की, टिम, तू ५०० अब्ज डॉलर्ससह अमेरिकेत येतो आहेस; पण तू भारतात कारखाने काढतो आहेस. मला ते मंजूर नाही. भारतासाठी करायचे असेल तर कर; पण आमच्यासाठी तुला अमेरिकेतच उत्पादन करावे लागेल.
भारत सरकार म्हणते... ॲपल भारतातील गुंतवणूक योजनांवर ठाम असून, भारतातच महत्त्वाचे उत्पादन केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली. सध्या जगभरात विकले जाणारे १५ टक्के आयफोन भारतात तयार होतात.