"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:23 IST2025-06-20T19:23:12+5:302025-06-20T19:23:38+5:30

आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, आपल्या आमंत्रणासाठी धन्यवाद, पण...!

Donald Trump called and invited me to come to America, I politely declined PM Modi explained the reason narendra modi lord jagannath | "डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण

"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ओडिशातील भुवनेश्वर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, भगवान जगन्नाथांच्या भूमीत येण्यासाठी आपण ते नम्रपणे नाकारले, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "नुकतेच दोन दिवसांपूर्वी मी जी-७ शिखर परिषदेसाठी कॅनडामध्ये होतो. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला फोन केला होता. ते म्हणाले होते, आपण कॅनडाला तर आला आहातच, तर आता वॉशिंग्टन मार्गे जा. त्यांनी मला बऱ्याच आग्रहाने आमंत्रित केले होते. मात्र आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, आपल्या आमंत्रणासाठी धन्यवाद, पण मला तर महाप्रभुंच्या धरतीवर जाणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मी त्यांचे आमंत्रण नम्रपणे नाकारले."

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "आदिवासी बंधूंचे स्वप्ने पूर्ण करणे, त्यांना नवीन संधी देणे, त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करणे, हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. म्हणूनच आदिवासी विकासासाठी देशात पहिल्यांदाच दोन मोठ्या राष्ट्रीय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही योजनांवर १ लाख कोटी रुपयांहूनही अधिक खर्च केला जात आहे. पहिली योजना म्हणजे 'धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान'. बिरसा मुंडा जी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत देशभरातील ६०,००० हून अधिक आदिवासी गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत. येथे ओडिशामध्येही आदिवासींसाठी घरे बांधली जात आहेत, रस्ते बांधले जात आहेत, वीज आणि पाण्याची सुविधा निर्माण केली जात आहे. ओडिशाच्या ११ जिल्ह्यांमध्ये ४० निवासी शाळाही बांधल्या जात आहेत. केंद्र सरकार यावर शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे." 

"दुसरी योजना म्हणजे, 'पीएम जन-मन योजना'. या योजनेची प्रेरणा ओडिशाच्या भूमीतून मिळाली आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती, ओडिशाची कन्या, आदरणीय द्रौपदी मुर्मू यांनी या योजनेसाठी आम्हाला मार्गदर्शन केले आहे," असे मोदी यांनी म्हटले आहे.

Web Title: Donald Trump called and invited me to come to America, I politely declined PM Modi explained the reason narendra modi lord jagannath