भटक्या कुत्र्यांची पुन्हा एकदा मोठी दहशत पाहायला मिळत आहे. यामुळे आता लोकांचे जीव घेऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्यामुळे नववीच्या वर्गातील विद्यार्थी शिवाचा तडफडून मृत्यू झाला.
बुढाना कोतवाली परिसरातील चंधेडी गावातील रहिवासी असलेला १५ वर्षीय विद्यार्थी शिवाला एक महिन्यापूर्वी गावातील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. पण भीतीमुळे विद्यार्थ्याने त्याच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली नाही. ज्यामुळे मुलाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि अखेर रेबीजच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला.
घटनेच्या दोन दिवसांनंतर गावकऱ्यांनी त्या भटक्या कुत्र्यालाही मारहाण करून ठार मारल्याचं सांगण्यात येत आहे. कुत्रा चावल्यानंतर एक महिन्यानी शाळेत चक्कर आल्याने विद्यार्थी शिवाची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं, तेथून त्याला मेरठला रेफर करण्यात आलं.
रेबीजची लक्षणं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तेथून पीजीआय चंदीगडला रेफर केलं. पण चंदीगडला जाताना सोमवारी सकाळी विद्यार्थी शिवाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्याचं कुटुंब खूप दुःखात आहे. आता संपूर्ण परिसरात भटक्या कुत्र्यांची भीती पसरली आहे. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी सरकारला विनंती केली आहे की, या भटक्या कुत्र्यांसाठी व्यवस्था करावी, जेणेकरून दुसऱ्या कोणाच्या मुलाचा मृत्यू होऊ नये.
शिवाचे वडील सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलाला एक महिन्यापूर्वी भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. पण आम्हाला समजलं नाही. जेव्हा आम्हाला कळलं की त्याला कुत्रा चावला आहे, तेव्हा आम्ही त्वरित कारवाई केली. मी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं. पण तिथे त्याच्यावर कोणतेही उपचार झाले नाहीत. डॉक्टरांनी त्याला दुसरीकडे उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितलं. अखेर मुलाचा मृत्यू झाला.