डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'अँटीबायोटिक्स' घेऊ नका, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केले कळकळीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:59 IST2025-12-29T12:58:24+5:302025-12-29T12:59:34+5:30
पंतप्रधानांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) एका ताज्या अहवालाचा दाखला दिला.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'अँटीबायोटिक्स' घेऊ नका, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केले कळकळीचे आवाहन
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाद्वारे 'अँटीबायोटिक रेझिस्टन्स' (प्रतिजैविक प्रतिरोध) या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स घेणे ही एक गंभीर समस्या बनत असून, नागरिकांनी स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधानांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) एका ताज्या अहवालाचा दाखला दिला.
अँटीबायोटिक सामान्य आजारांवर आता निकामी
पंतप्रधान म्हणाले, या अहवालानुसार, निमोनिया आणि मूत्रमार्गाचे संसर्ग सारख्या आजारांवर आता अँटीबायोटिक औषधे निकामी ठरत आहेत.
औषधे प्रभावी न ठरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांकडून होणारा या औषधांचा अंधाधुंद आणि चुकीचा वापर, म्हणून मनाने औषध घेणे टाळा, असे पंतप्रधान म्हणाले.
‘...तर अँटीबायोटिक्सला डॉक्टरांची गरज’
पंतप्रधान म्हणाले की, "आजकाल लोकांना असे वाटू लागले आहे की एखादी गोळी घेतली की सर्व समस्या सुटतील. पण यामुळेच संसर्ग आणि आजार या औषधांपेक्षा जास्त ताकदवान होत आहेत. अँटीबायोटिक्स ही काही अशी औषधे नाहीत जी कोणताही विचार न करता घेतली जावीत."
त्यामुळे "औषधांना मार्गदर्शनाची गरज असते, व अँटीबायोटिक्सला डॉक्टरांची!" हा सराव तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
२०२५ हे अभिमानास्पद कामगिरीचे वर्ष होते
२०२५ मध्ये देशाच्या सुरक्षेपासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, विज्ञान प्रयोगशाळांपासून ते जगातील प्रमुख व्यासपीठापर्यंत भारताने सर्वत्र एक मजबूत छाप सोडली.
'ऑपरेशन सिंदूर' प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले. जगाने स्पष्टपणे पाहिले की, आजचा भारत सुरक्षेशी तडजोड करत नाही. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, देशभरातून लोकांनी त्यांच्या भावना त्यांच्या पद्धतीने व्यक्त केल्या, असे पंतप्रधान म्हणाले.