Delhi Blast DR. Umar Un Nabi:दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या भीषण कार स्फोटामागे कार्यरत असलेल्या 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल'चा उलगडा झाला आहे. या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार आणि स्फोटकांनी भरलेली ह्यूंडई आय२० कार चालवणारा दहशतवादी डॉक्टर उमर नबीच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. स्फोट झालेल्या कारच्या ढिगाऱ्यात सापडलेला जळालेला मृतदेह हा उमरच्या कुटुंबीयांच्या डीएनए नमुन्यांशी जुळला आहे. प्रतिष्ठित पेशाचा वापर दहशतवादासाठी करणाऱ्या या नेटवर्कमुळे देशात खळबळ माजली आहे.
डॉ. उमर नबी भट हा मूळचा पुलवामा येथील रहिवासी होता. तो एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता. तयाने श्रीनगरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि त्यानंतर एमडीची पदवी मिळवली होती. नीट-पीजी परीक्षेतही तो अव्वल ठरला होता. फरीदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये तो सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याच्यासारखा उच्चशिक्षित व्यक्ती दहशतवादाकडे वळल्याने सुरक्षा यंत्रणांना मोठा धक्का बसला आहे.
व्हाईट कॉलर मॉड्यूल
या मॉड्यूलमध्ये फक्त डॉक्टरच नव्हे, तर मौलवी आणि इतर उच्चशिक्षित तरुणही सामील होते. जम्मू आणि काश्मीर ते हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत या नेटवर्कचा विस्तार होता. यातील सदस्य एनक्रिप्टेड ॲप्स आणि टेलिग्राम चॅनेल्सचा वापर करून कट्टरपंथी बनले होते. फरीदाबाद येथील शैक्षणिक संस्थांना त्यांनी आपल्या कारवायांचे केंद्र बनवले होते. उमर नबी व्यतिरिक्त, अल-फलाह युनिव्हर्सिटीमधील दुसरे डॉक्टर मुझम्मिल अहमद गनाई आणि डॉ. आदिल मजीद राथर यांनाही अटक करण्यात आली आहे.
मुझम्मिलच्या चौकशीतून फरीदाबाद येथे स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एका ठिकाणी तब्बल २,९०० किलो स्फोटके सापडली होती, ज्यामुळे या मोठ्या हल्ल्याच्या तयारीचा अंदाज येतो. उमर नबी तुर्कीयेतील अंकारा येथे असलेल्या UKasa नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता. तो आणि मुझम्मिल दोघेही २०२१ मध्ये तुर्कीयेला गेले होते, जिथे त्यांचा जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद यासारख्या दहशतवादी संघटनांच्या ओव्हरग्राउंड वर्कर्सशी संपर्क आल्याची शंका आहे.
लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे कारण
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, डॉ. उमर नबी आणि त्याच्या साथीदारांनी ६ डिसेंबरच्या आसपास मोठा स्फोट घडवण्याची योजना आखली होती. मात्र, स्फोट होण्याच्या काही दिवस आधी मुझम्मिल आणि इतरांना अटक झाली आणि प्रचंड स्फोटकांचा साठा जप्त झाल्याची बातमी कळताच, उमर घाबरला. सुरक्षा यंत्रणांच्या दबावाखाली घाबरून त्याने १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली, ज्यात तो स्वतःही मारला गेला. केंद्र सरकारने या घटनेला 'दहशतवादी हल्ला' म्हणून घोषित केले असून एनआयए या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.
Web Summary : Delhi blast's 'white collar terror module' exposed. Dr. Umar Nabi, the mastermind, died in the explosion. He used encrypted apps, had ties to terror groups, and planned a larger attack before panicking and detonating the car near Red Fort.
Web Summary : दिल्ली विस्फोट का 'व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल' उजागर। मास्टरमाइंड डॉ. उमर नबी विस्फोट में मारे गए। उन्होंने एन्क्रिप्टेड ऐप्स का इस्तेमाल किया, आतंकी समूहों से संबंध थे, और दहशत में लाल किले के पास कार में विस्फोट कर दिया।