Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 06:47 PM2018-08-07T18:47:32+5:302018-08-08T06:06:19+5:30

Karunanidhi Death Update : डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले. 

DMK chief Karunanidhi passes away | Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन

Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन

Next

चेन्नई - सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी संध्याकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधींच्या निधनामुळे त्यांचे तामिळनाडूमधील समर्थक शोकसागरात बुडाले आहेत.

3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळनाडूच्या राजकारणावर प्रदीर्घकाळ आपला ठसा उमटवला होता. करुणानिधी यांनी 1949 साली अण्णादुराई यांच्याबरोबर द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोषाध्यक्ष झाले. 1957 साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे 13 सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यानंतर त्यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते नेहमीच विजयी होत राहिले.  1969 साली डीएमके पक्षाचे प्रमुख एन. अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधी यांनी डीएमकेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी डीएमकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. यादरम्यान पाचवेळा त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.


करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. तसेच आपली बुद्धिमत्ता आणि वकृत्वकौशल्याच्या जोरावर ते लवकरच कुशल राजकारणी बनले. द्रविड आंदोलनामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. जस्टिस पार्टीचे के. अलगिरिस्वामी यांच्या एका भाषणावर प्रभावित होऊन करुणानिधी यांनी वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. तसेच तामिळनाडूत सुरू झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या भागातील तरुणांसाठी एका संघटनेची सुद्धा स्थापना केली होती.  प्रतिभावंत असलेल्या करुणानिधी यांचे तामिळ भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक पुस्तके, कादंबऱ्या, नाटके आणि अनेक तामिळ चित्रपटांचे संवाद लेखन केले होते. चित्रपट सृष्टीमधून राजकारणात उतरल्यानंतर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव स्वीकारला नव्हता. तामिळनाडूमधील त्यांचे समर्थक त्यांना कलाईनार अर्थात कलेचा विद्वान म्हणून संबोधत असत.  

Web Title: DMK chief Karunanidhi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.