पत्नीला घटस्फोट, महिलेशी जवळीक..., योग शिक्षकाला ७ फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडले, तीन महिन्यांनी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:48 IST2025-03-25T16:48:40+5:302025-03-25T16:48:56+5:30
Haryana Crime News:

पत्नीला घटस्फोट, महिलेशी जवळीक..., योग शिक्षकाला ७ फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडले, तीन महिन्यांनी सापडला मृतदेह
हरयाणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रोहतक जिल्ह्यात असलेल्या बाबा मस्तनाथ विद्यापीठामधून मागच्या ९१ दिवसांपासून बेपत्ता असलेले योग शिक्षक जयदीप यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपींनी जयदीप यांना चरखी दादरी जिल्ह्यातीलल एका शेतामध्ये जिवंत पुरले होते. त्यांचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत सापडला आहे.
या हत्येबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप यांचा घटस्फोट झालेला आहे. तसेच गेल्या काही काळापासून त्यांची एका महिलेसोबत जवळीळ निर्माण झाली होती. आरोपींनी आधी जयदीपचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला दादरीमधील पैंतवास गावामध्ये जिवंत पुरले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी हरदीप आणि धर्मपाल यांना अटक केली असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शोध घेऊन जयदीप याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
जयदीप हे रोहतक येथील बाबा मस्तनाथ विद्यापीठामध्ये योग शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच रोहतक येथे भाड्याच्या घरात राहत होते. यादरम्यान, ते कधी कधी नातेवाईकांना भेटण्यासाठी घरी जायचे. मात्र २४ डिसेबंर २०२४ पासून ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. अखेरीस आता तीन महिन्यांनंतर त्यांचा मृतदेह पैंतावास कलां गावात एका शेतामध्ये पुरलेल्या स्थितीत सापडला.
या प्रकरणी रोहतक पोलिसांनी हरदीप आणि धर्मपाल यांना अटक केली आहे. या दोघांनीही या गावातील राजकरणच्या मदतीने जयदीप यांचं अपहरण केलं होतं. मात्र ज्या महिलेसोबत जयदीप यांची जवळीक होती, ती कोण आहे आणि आरोपींसोबत तिचा काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.