Sweety Boora Attack Deepak Hooda: भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा आणि तिचा पती कबड्डीपटू दीपक हुडा यांच्यातील वाद वाढत चालला आहे. महिन्याभरापूर्वी स्वीटी बुराने हिसारमध्ये दीपकविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारीमध्ये स्वीटीने दीपकवर १ कोटी रुपये आणि फॉर्च्युनर कार घेऊनही हुंडा मागितल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या दिवशी, दीपकने रोहतकमध्ये स्वीटीच्या कुटुंबाविरुद्ध फसवणूक करून मालमत्ता मिळवल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला. त्यानंतर आता दीपक हुड्डाने स्वीटीने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हरियाणाच्या हिसारची भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा हिने तिचा पती आणि भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुडा याला महिला पोलीस ठाण्यात मारहाण केली. १५ मार्च रोजी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं असून याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. व्हिडीओमध्ये स्वीटी पोलीस ठाण्यात उपस्थित लोकांसमोर दीपक हुडाला मारहाण करताना आणि गळा दाबताना दिसत आहे. दीड मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वीटीच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं होतं.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वीटी बुराने या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. स्वीटीने यावेळी दीपक हुडावरही गंभीर आरोप केले आहेत. स्वीटीने पोलीस अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत स्वीटीने नैराश्यामध्ये असल्याबद्दल सांगितले. माझ्यावर हल्ला किंवा अपघात झाला तर त्याला दीपक हुडा आणि हिसारचे पोलीस अधिक्षक जबाबदार असतील, असं स्वीटीने म्हटलं. तसेच दीपक हुडाला मुलांमध्ये रस आहे. या सगळ्या गोष्टी मला नंतर कळल्या. मला जाणूनबुजून हिंसक दाखवले जात आहे. दीपक हुड्डाच मला मारहाण करायचा असाही आरोप स्वीटी बुराने केला.
"दीपक हुडाने लग्नापूर्वी माझ्याकडे हुंडा म्हणून अडीच कोटी रुपयांची मर्सिडीज मागितली होती. माझा पती मारहाण करत असे. ते जास्त झाले की हातपाय पकडून रडायला लागायचा आणि म्हणायचा की मी आई-वडील नसलेले मूल आहे. हे ऐकल्यानंतर मी अनेकदा त्याला माफ केले. एकदा चंदीगडमध्ये मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परतत होती. चालत्या वाहनात दीपकने मला मारहाण करून गळा आवळला," असं स्वीटीने सांगितले.
"दीपकने मला व्हिडिओ दाखवण्यासाठी बोलावले होते. व्हिडिओची सुरुवात आणि शेवटचा भाग दिसत नाही, ज्यामध्ये दीपक मला शिवीगाळ करत आहे. मला नंतर पॅनिक अटॅक आला होता, तो भागही गायब होता. पोलीस स्टेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला म्हणजे हिसारचे पोलीस अधिक्षक दीपकसोबत या प्रकरणात सहभागी आहेत. हिसारच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व्हिडिओसोबत छेडछाड केली आहे. त्यापूर्वी आणि त्यादरम्यान घडलेल्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या नाहीत," असंही स्वीटीने म्हटलं.