मुख्य पोस्ट कार्यालयात ग्राहकांची गैरसोय
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
येथील मुख्य पोस्ट कार्यालयात अनेक बचत योजनेबाबत ग्राहकांची गैरसोय होत आहे़
मुख्य पोस्ट कार्यालयात ग्राहकांची गैरसोय
येथील मुख्य पोस्ट कार्यालयात अनेक बचत योजनेबाबत ग्राहकांची गैरसोय होत आहे़ नवीन खाते काढण्यासाठी व कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी पोस्ट मास्तर, नांदेड या नावे क्रॉस चेक स्वीकारले जात असे़ परंतु आता असे धनादेश स्वीकारले जात नाहीत़ त्यामुळे ग्राहकांची अडवणूक होत आहे़ तर दुसरीकडे उप पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्तरच्या नावे दिलेले क्रॉस चेक स्वीकारले जातात़ किसान विकास पत्राची एकही विक्री अद्याप मुख्य पोस्ट कार्यालयातून झाली नाही़ त्यामुळे गुंतवणूकधारकांना गुंतवणूक करण्यास त्रास होत आहे़ या किसान विकास पत्राची विक्री उप पोास्ट कार्यालयात काही ठिकाणी सुरू आहे़ एनएससी, किसान विकास पत्र, मासिक प्राप्ती योजना यांची मुदतपुर्ती नंतर मिळणारी रक्कम परस्पर कोणत्याही पोस्टांच्या योजनेत करता येत असे़ पण आता २२ डिसेंबर २०१४ पासून ही सवलत मुख्य पोस्टात बंद केली आहे़ मुख्य पोस्टात एकही नवीन आरडी खाते उघडण्यात आले नाही़ तसेच नवीन बचत खाते पुस्तिका घेण्यासाठी आठ दिवसांचा विलंब लावला जात आहे़ यासंदर्भात ग्राहकांनी मुख्य पोस्ट कार्यालयात चौकशी केली असता त्यांना येथील कर्मचारी नवीन असल्याने संगणक वापरण्याचा पुरेसा अनुभव नसल्याचे कळाले़ त्यामुळे अल्पबचत गुंतवणूकदारांना त्रास होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे़ यासंदर्भात पोस्ट मास्तर, पोस्ट मास्तर जनरल यांनी दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे़