इंडिया आघाडीत मतभिन्नता, काँग्रेसला सतावतेय चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 07:50 IST2024-12-10T07:50:08+5:302024-12-10T07:50:30+5:30
तृणमूल, सपा, आप संसदेतील आंदोलनापासून दूर. इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली आणि जेपीसीच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली.

इंडिया आघाडीत मतभिन्नता, काँग्रेसला सतावतेय चिंता
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अदानी मुद्यावरून विरोधकांनी सोमवारी निदर्शने केली. मात्र, तृणमूल, सपा आणि आप हे पक्ष यापासून दूर राहिले. त्यामुळे इंडिया आघाडीतील मतभिन्नता समोर आली आहे. यामुळे काँग्रेसची काळजी वाढली आहे.
इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली आणि जेपीसीच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह द्रमुक, राजद, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना आदी पक्षांच्या नेत्यांनी यावेळी आम्हाला न्याय हवा, अशी घोषणाबाजी केली.
हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर लगेचच इंडिया आघाडीतील मतभेद सुरू झाले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नेतृत्व करावे, अशी मागणी तृणमूलने सर्वप्रथम केली. याला राष्ट्रवादी (शरद पवार), राजद, सपा आणि आप यांनी पाठिंबा दिला. मात्र, तृणमूल, सपा आणि आप हे इंडिया आघाडीच्या निदर्शनाला अनुपस्थित राहिले.
सपाच्या सूत्रांनी सांगितले की, संभल हिंसाचाराच्या वेळी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही. तथापि, सपाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव म्हणाले की, विरोधी गटात सर्व काही ठीक आहे. विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक बोलाविण्याची मागणी केली जाऊ शकते. तृणमूल काँग्रेस, सपा, आप आणि इतरांना असे वाटते की मतदारांना प्रेरित करण्यासाठी योग्य प्रकारचे मुद्दे मांडण्यात राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत.
इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांना काय वाटते?
nतेजस्वी यादव (राजद) यांच्यासह इतर अनेक नेत्यांना असेही वाटते की इतर नेत्यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी दिली जावी. सपा आधीच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती.
nतरीही सपा राष्ट्रीय राजकारणात इंडिया आघाडीचा भाग राहील. इंडिया आघाडीतील घटक पक्षातील मतभेद समोर आल्याने त्यांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने जून २०२३ मध्ये या आघाडीची स्थापना करण्यात आली होती.