जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी ईव्हीएमवरील (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे, हे दुटप्पीपणाचे आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते पीटीआयच्या मुलाखतीत बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर आता काँग्रेसने पलटवार केला आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उमर अब्दुल्ला यांचा विरोधकांशी संबंधित मुद्द्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
नॅशनल कॉन्फरन्स नेते, इंडिया आघाडीचा भाग असलेले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, असे होऊ शकत नाही की जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकता तेव्हा तुम्ही निकाल स्वीकारता आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही ईव्हीएमला दोष देता. यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी त्यांचा जुना व्हिडीओ शेअर करत उमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. टागोर म्हणाले, 'त्यांनी आपली वस्तुस्थिती तपासावी.' लोकसभेतील पक्षाचे व्हिप टागोर यांनी विचारले की उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मित्रपक्षांबद्दल असा दृष्टिकोन का आहे?, असा सवाल केला.
उमर अब्दुल्ला यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. या पोस्टमध्ये ते म्हणाले, 'समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) ईव्हीएमच्या विरोधात बोलले आहेत. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, कृपया तुमचे तथ्य तपासा, असंही या पोस्टमध्ये म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. शरद पवार यांनीही शंका उपस्थित केली होती. काँग्रेसने देशभरात आंदोलनाचा इशारा दिला होता.