महाकुंभला जाऊन आला? पाणी ना पिण्यासाठी, ना अंघोळ करण्यालायक होते; या विषाणूमुळे लोक आजारी पडू लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:08 IST2025-02-19T16:07:57+5:302025-02-19T16:08:16+5:30
महाकुंभला यंदा ५० कोटींहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. महाकुंभहून दिल्लीत परतलेल्या लोकांना हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत.

महाकुंभला जाऊन आला? पाणी ना पिण्यासाठी, ना अंघोळ करण्यालायक होते; या विषाणूमुळे लोक आजारी पडू लागले
महाकुंभला जाऊन आलेल्या लोकांसाठी, तसेच जात असलेल्या लोकांसाठी एक चिंताजनक माहिती समोर येत आहे. महाकुंभला संगमावर डुबकी लावणाऱ्या लोकांमध्ये उलट्या, जुलाब, पोटाच्या विकारांनी ग्रासले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीला अहवाल सोपविला आहे. याणध्ये नदीच्या प्रदुषणात मोठी वाढ झाल्याचे म्हटले आहे. हे पाणी ना पिण्यालायक आहे ना अंघोळ करण्यालायक, असे यात म्हटले आहे. प्रयागराजमधील संगमावरील पाण्यात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर सापडला आहे.
महाकुंभहून दिल्लीत परतलेल्या लोकांना हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत. महाकुंभला यंदा ५० कोटींहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. मनी कंट्रोल च्या वृत्तानुसार अपोलोच्या डॉ़क्टरांनी याची पुष्टी केली आहे.
महाकुंभहून परत येणाऱ्या लोकांमध्ये आम्ही काही वैद्यकीय समस्या पाहत आहोत. जिथे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झाले आहे, तिथे लोकांनी डुबकी घेतली की आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. परंतू, कुंभला जाणाऱ्यांची संख्या पाहिली तर रुग्णांची संख्या त्या मानाने खूप कमी असल्याचे ओपोलोच्या वरिष्ठ डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
कुंभमेळ्यात स्नान केलेल्या काही लोकांना गॅस्ट्रो-एंटेरिटिससारखे आजार झालेले आहेत. त्यांना अतिसार, उलट्या आणि इतर तत्सम समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही लोकांना व्हायरल तापही येत आहे. बरेच लोक श्वसन संसर्ग आणि खोकला आणि सर्दी सारख्या सामान्य आजारांनी ग्रस्त आहेत, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
कोणती काळजी घ्याल...
महाकुंभला जाणाऱ्यांनी काही काळजी घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. पिण्याचे पाणी घेऊन जावे किंवा चांगल्या ठिकाणचे पाणी प्यावे, तसेच निरोगी ठिकाणाहून अन्न खावे आणि कच्च्या अन्नाऐवजी शिजवलेले अन्न खावे.
मास्क घालावे, तसेच नदीत डुबकी मारताना पाणी पिऊ नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.