नवी दिल्ली : ‘पूजा खेडकरने कोणता गंभीर गुन्हा केला आहे का? ती ड्रग्जमाफिया किंवा दहशतवादी नाही, तिने खून केलेला नाही, ती एनडीपीएस गुन्हेगार नाही, तुम्ही तपास पूर्ण करा, तिने सर्वस्व गमावले आहे, तिला कुठेही नोकरी मिळणार नाही’, असे तोंडी निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाusने नोंदवले व तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्या. बी. व्ही. नागरत्ना व सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पूजाला चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा तसेच ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचे फायदे लाटल्याचा पूजावर आरोप आहे. या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती पाहता दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्तीला जामीन मंजूर करायला हवा होता, असेही खंडपीठाने म्हटले. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी पूजा खेडकर हिला जामीन देण्यास विरोध केला. पूजा खेडकर ही तपासामध्ये सहकार्य करत नाही. तसेच तिच्याविरोधातील आरोप हे गंभीर आहेत, असे सांगितले. पूजा खेडकर हिच्यावर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी २०२२ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.
काय आहेत आरोप? २०२२च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा पूजा खेडकरवर आरोप आहे. तिने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.