"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:41 IST2025-09-23T11:40:26+5:302025-09-23T11:41:28+5:30
बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठं विधान केलं आहे.

"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
नवरात्रौत्सवादरम्यान छतरपूर येथील बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा गैर-हिंदूंना गरबा कार्यक्रमांत बंदी घालण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. "जर सनातनी हिंदू विचारसरणीचे लोक हजला जात नसतील, तर त्यांनी (मुस्लिम समुदायाने) गरब्यात सहभागी होऊ नये" असं स्पष्ट शब्दांत धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
"गरबा कार्यक्रमांच्या मुख्य प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवलं पाहिजे" अशी मागणीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केली आहे. छतरपूर येथील प्रसिद्ध बंबरबेणी मंदिरात धीरेंद्र शास्त्री पोहोचले. भाविकांनी आरती आणि पुष्पवृष्टी करून त्यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. याच दरम्यान त्यांच्या या विधानाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
नवरात्र उत्सवादरम्यान होत असलेल्या गरब्यांमध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा. गरबा आयोजकांनी प्रत्येकाला आधार कार्ड पाहूनच प्रवेश द्यावा, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भूमिकेचे समर्थन केले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या भूमिकेला तीव्र विरोध दर्शविला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, गरबा हा केवळ एक नृत्य प्रकार नाही तर ती दुर्गेची केलेली पूजा आहे आणि मूर्तिपूजेवर विश्वास नाही अशा लोकांना गरबा सुरू असताना प्रवेश दिला जाऊ नये. विविध मंडळांना आम्ही तशी सूचना केलेली आहे. प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येकाचे आधार कार्ड तपासून मगच प्रवेश द्या.
गरबा खेळायला वा बघायला जे येतील त्यांचे स्वागत प्रवेशद्वारावरच टिळा लावून करा म्हणजे ते हिंदूच असल्याचे स्पष्ट होईल. नायर यांनी असेही स्पष्ट केले की, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गरबा उत्सवांच्या ठिकाणी नजर असेल. ज्यांची देवीवर श्रद्धा-भक्ती नाही, त्यांना आत येऊ दिले जाणार नाही.