हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:59 IST2025-08-08T16:58:57+5:302025-08-08T16:59:45+5:30
उत्तरकाशीतील धराली येथील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करण्याठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आले होते. त्यावेळी एक हृदयस्पर्शी घटना घडली.

हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
उत्तरकाशीतील धराली येथील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करण्याठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आले होते. त्यावेळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. अहमदाबादमधील इशानपूर येथील रहिवासी धनगौरी बरौलिया आपल्या कुटुंबासह गंगोत्रीला भेट देण्यासाठी आल्या होत्या. ५ ऑगस्ट रोजी धराली येथे आलेल्या भयानक आपत्तीमुळे त्यांचं आयुष्यच बदललं. जोरदार प्रवाहामुळे रस्ता बंद झाला आणि त्या कुटुंबासह अडकल्या. सर्वत्र विनाश, भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण होतं. घरापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या कोणालाही पुढे काय होईल हे माहित नव्हतं.
मुख्यमंत्री धामी यांच्या नेतृत्वाखाली मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू झालं. कठीण परिस्थितीतही बचाव पथकांनी सतत प्रयत्न केले आणि धनगौरी आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढलं. जेव्हा मुख्यमंत्री धामी तीन दिवस सतत आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करत होते, तेव्हा धनगौरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू भीतीचे नव्हते तर विश्वासाचे होते. त्यांनी पुढे येऊन आपली साडी फाडली आणि त्याचा एक तुकडा मुख्यमंत्र्यांच्या मनगटावर राखी म्हणून बांधला.
धराली (उत्तरकाशी) में आपदा प्रभावित क्षेत्रों के निरीक्षण के दौरान एक बहन ने साड़ी का किनारा फाड़ कर मेरी कलाई पर राखी के प्रतीक के रूप में बांधा तो मन अत्यंत भावुक हो उठा।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 8, 2025
ना थाली, ना चंदन, केवल एक कपड़े का टुकड़ा, लेकिन उसमें रिश्ते का सच्चा एहसास, सुरक्षा का वचन, और मानवता का… pic.twitter.com/DR2B4OFBpA
राखी बांधताना महिला भावुक झाली आणि म्हणाली, "माझ्यासाठी मुख्यमंत्री धामी हे भगवान श्रीकृष्णासारखे आहेत, ज्यांनी केवळ माझंच नाही तर येथे उपस्थित असलेल्या सर्व माता-भगिणींचं भावासारखं रक्षण केलं आहे. ते तीन दिवस आमच्यामध्ये राहून आमच्या सुरक्षिततेची आणि गरजांची काळजी घेत आहेत." हा फक्त एक कापडाचा तुकडा नाही तर बहिणीचं भावावर असलेलं प्रेम आणि विश्वास आहे.
मुख्यमंत्री धामी यांनीही महिलेला आश्वासन दिलं की, एक भाऊ म्हणून ते प्रत्येक परिस्थितीत आपत्तीग्रस्त बहिणींसोबत उभे राहतील आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. धरालीच्या कठीण परिस्थितीत या भावा-बहिणीच्या नात्यातील हृदयस्पर्शी क्षणाने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. ढगफुटीमुळे धरालीचं मोठं नुकसान झालं आहे.