स्वदेशी वैमानिकांची संख्या वाढवण्यावर ‘डीजीसीए’चा भर, प्रशिक्षण नियमांत बदल; परवानगी प्रक्रिया केली सोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 13:17 IST2022-02-07T13:15:50+5:302022-02-07T13:17:25+5:30
गेल्या वर्षात डीजीसीएने आजवरचे सर्वाधिक ७५६ परवाने वितरित केले. त्यापैकी ४० टक्के वैमानिकांनी परदेशी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.

स्वदेशी वैमानिकांची संख्या वाढवण्यावर ‘डीजीसीए’चा भर, प्रशिक्षण नियमांत बदल; परवानगी प्रक्रिया केली सोपी
मुंबई : स्वदेशी वैमानिकांची संख्या वाढवण्यासाठी डीजीसीए आणि विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी काही नियमांत बदल करून परवानगी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षात डीजीसीएने आजवरचे सर्वाधिक ७५६ परवाने वितरित केले. त्यापैकी ४० टक्के वैमानिकांनी परदेशी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे भारतात नव्या प्रशिक्षण संस्था उभारून उपयोग काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण नियमांत काही बदल करण्यात आले असून, विमान देखभाल अभियंता आणि फ्लाइंग क्रू पदासाठी उमेदवारांच्या मागणीनुसार ऑनलाइन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शिवाय हवाई प्रशिक्षण संस्थांमध्ये हवाई कार्यान्वयनाला अधिकृत परवानगी देण्याचा अधिकार प्रदान करण्यासह हवाई प्रशिक्षकांना सक्षम करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याआधी हे अधिकार केवळ मुख्य आणि उप मुख्य हवाई प्रशिक्षकांना होते. त्याचप्रमाणे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुक्त हवाई प्रशिक्षण संस्था धोरण आणले आहे. त्यात विमानतळ स्वामित्वधन ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे. जमिनीचे भाडेही कमी करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशची संस्था महाराष्ट्रात देणार प्रशिक्षण! -
उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये ‘‘इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी’’ ही देशातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था आहे. हिवाळ्यात कमी दृष्यमानतेमुळे या संस्थेच्या प्रशिक्षणावर विपरीत परिणाम होत असतो. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेला गोंदिया आणि कलबुर्गी (कर्नाटक) येथे वैमानिक प्रशिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.
किती वैमानिक भारतीय संस्थेत शिकले? -
२०२० - ४३०
२०२१ - ५०४