महाकुंभात पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास; योगी नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:09 IST2025-02-12T09:08:30+5:302025-02-12T09:09:00+5:30
योगी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कुंभाच्या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले आणि संबंधितांना निलंबित करण्याचा इशाराही दिला.

महाकुंभात पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास; योगी नाराज
राजेंद्र कुमार
लखनौ : प्रयागराज येथील महाकुंभात पवित्र स्नानासाठी जात असलेल्या भाविकांना प्रचंड गोंधळ, वाहतूक कोंडी यांचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य प्रशासन वाहतूक कोंडी नसल्याचा दावा करत असले तरी प्रयागराज जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर भाविकांची हजारो वाहने उभी आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष मुख्यमंत्री योगींना लक्ष्य करत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची झडती घेतली.
स्नान करू इच्छिणाऱ्या भाविकांना तासनतास पायी चालत जावे लागत आहे. लोक रात्रभर रस्त्यावरील गाडीत झोपूनच पुढचा प्रवास करत आहेत. त्यामुळे टीकेचा भडीमार झाल्याने योगी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कुंभाच्या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले आणि संबंधितांना निलंबित करण्याचा इशाराही दिला.
भाविकांवर काळाचा घाला, ७ ठार
कुंभमेळ्यातील भाविकांना घेऊन परतणाऱ्या मिनी बसची व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने मंगळवारी झालेल्या अपघातात ७ ठार तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणातील नागरिकांचा सामवेश आहे. सिमेंट घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हर टेक करण्याच्या नादात मिनी बसला धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे मिनी बसचा पुढील भागाचा चुराडा झाला आहे.
गर्दी इतकी की ट्रेनवर केली दगडफेक
जयनगरहून नवी दिल्लीला जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी सुपरफास्ट ट्रेनवर सोमवारी समस्तीपूर आणि मधुबनी जंक्शनवर प्रयागराजला जाणाऱ्या जमावाने दगडफेक केली. ट्रेनचा एस३ कोच रिकामा न झाल्याने स्टेशनवर उभ्या असलेल्या अनियंत्रित जमावाने दगडफेक केली. यामुळे एसी थ्री कोचच्या काचा फुटल्या. तर, काही प्रवासी जखमीही झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग १५ वर अनेक किलोमीटरचा जाम आहे.