"अडवाणी देशाचे लोहपुरूष; ६० वर्ष राजकारणात सक्रिय तरीही.."; फडवणीसांची बोलकी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 15:43 IST2024-02-03T15:42:38+5:302024-02-03T15:43:32+5:30
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यावर फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

"अडवाणी देशाचे लोहपुरूष; ६० वर्ष राजकारणात सक्रिय तरीही.."; फडवणीसांची बोलकी प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on LK Advani Bharat Ratna: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत एक पोस्ट केली आणि याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख 'लोहपुरूष' असा केला.
🕐 12.51pm | 3-2-2024 📍 Beed | दु. १२.५१ वा. | ३-२-२०२४ 📍 बीड.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2024
LIVE | Media interaction.#Maharashtra#Beed
(Deferred Live) https://t.co/E2oN5C47rE
"लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचा मला अतिशय आनंद आहे. आडवणी हे खऱ्या अर्थाने देशाचे लोहपुरूष राहिलेले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची राम जन्मभूमीच्या आंदोलनातील भूमिका आणि देशाचे गृहमंत्री म्हणून कणखर नेतृत्व या बाबी विशेष महत्त्वाच्या आहेत. त्यांनी आयुष्यातील ६० ते ७० वर्षांच्या कालावधीत राजकारण केले. इतक्या वर्ष ते राजकारणात सक्रिय होते तरीही ते निष्कलंक राहिले हे खासकरुन लक्षात घेतले पाहिजे. त्याबरोबरच त्यांचा अभ्यास व व्यासंग खूप आहे. आपण त्यांचे विचार ऐकले किंवा संघर्ष जाणून घेतला तर त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढतो. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाला भारतरत्न मिळाला ही खूपच समाधानाची बाब आहे", अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. यावर लालकृष्ण अडवाणी यांचे सुपुत्र जयंत अडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. "लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार दिल्याबाबत सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कुटुंबासाठी, देशासाठी आणि आम्हा सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. राम मंदिरासाठी १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा झाली. तेव्हापासून अनेक कायदेशीर बाबी आल्या. अनेक गोष्टी घडल्या. मात्र, आजच्या घडीला प्रत्यक्षात राम मंदिर सर्वांसमोर उभे राहिले आहे. राम मंदिराचे आंदोलन हे लालकृष्ण अडवाणी यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता. राम मंदिराचे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजले. खूप संघर्ष झाला. आंदोलन यशस्वी होऊन राम मंदिर बनल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे", असे जयंत अडवाणी म्हणाले.