आजच्या काळात वाढलेली स्पर्धा आणि नोकरीच्या निर्माण होणाऱ्या कमी संधी, यामुळे अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केल्यावर हाती निराशा पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काही जणांना गुणवत्ता असूनही वारंवार प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही. अशाच वारंवार नोकरीची संधी नाकारली गेलेल्या एका तरुणाने रागाच्या भरात असं काही केलं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही.
नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी काही ना काही उणीव काढत नाकारण्यात आल्याने वैतागलेल्या या तरुणाने एक गमतीदार (पॅरोडी) रिझ्युमे तयार केला. त्यामध्ये काही माहिती ही चित्रविचित्र आणि गमतीदार पद्धतीने लिहिण्यात आली. ३० वर्षांच्या वयात ३२ वर्षांचा अनुभव, टेलिपॅथिक डिबगिंगमध्ये तज्ज्ञ, एमआयटी, हॉगवर्ट्स आमि कोर्सेरा येथून पीएचडी, कॉफी आणि ऑक्सिजनशिवाय काम करण्याची क्षमता, गुगल एक्स क्वांटम लॅब्स आणि मेटा एआय डिपार्टमेंटमध्ये नोकरी, एवढंच नाही तर एका कंपनीने मला काढून माझ्या जागी ३० इंजिनियर्सची नेमणूक केली, कारण त्यांना माझा खर्च परवडत नव्हता, असे एक ना अनेक गमतीदार उल्लेख या रिझ्युमेमध्ये होते.
रेडिटवर व्हारयल होत असलेल्या एका पोस्टमध्ये या युझरने सांगितले की, नियोक्त्यांकडून तुमची प्रोफाइल आमच्याकडे असलेल्या कामासाठी पुरक नाही आहे यासारखी एकसारखी उत्तरं वारंवार देऊन काम नाकारण्यात आल्याने मी वैतागलो होतो. त्यामुळे एक गमतीदार पद्धतीचा रिझ्युम तयार करून मनातील रागाला मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न मी केला. या माध्यमातून कंपन्यांकडे नोकरीसाठी अर्ज करून त्यांचे वेळ वाया घालवण्याचा माझा हेतू होता, असेही या तरुणाने सांगितले.
मात्र याचा परिणाम उलटाच झाला. एके दिवशी या तरुणाने तयार केलेला बायोडाटा अनेक कंपन्यांपर्यंत पोहोचला. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी एका कंपनीने त्याला नोकरी नाकारली होती. पण आता त्याला मुलाखतीसाठी बोलावलं. एवढंच नाही तर अनेक नियोक्त्यांनी त्याच्या या गमतीदार रिझ्युमेचं कौतुकही केलं. तुमची प्रोफाईल खूप सुंदर आहे. आम्ही तुमच्याशी बोलू इच्छितो, असेही त्यापैकी काही जणांनी सांगितले. आता हा रिझ्युमे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.