टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 05:40 IST2025-10-02T05:40:19+5:302025-10-02T05:40:59+5:30
अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखविली नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व उराशी बाळगून संघ काम करत राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.

टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
नवी दिल्ली : अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखविली नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व उराशी बाळगून संघ काम करत राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.
१९२५ साली नागपूर येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. या संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजिलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, जात, पंथ आदींचे भेदभाव दूर सारून सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी देशातील प्रत्येक भागात संघाने काम केले.
मोदी यांनी सांगितले की, विजयादशमीच्या दिवशी रा. स्व. संघाची स्थापना झाली हा योगायोग नव्हे, तर हजारो वर्षांची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा तो क्षण होता. संघाची ओळख सुरुवातीपासूनच देशभक्ती व सेवाव्रती अशी राहिली आहे. संघ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचारांचा पुरस्कर्ता आहे. तरी स्वातंत्र्यानंतर संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून अडवण्याचे प्रयत्न झाले. या कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय सांस्कृतिक खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते.
‘देशाच्या चलनावर प्रथमच भारतमाता’
या शंभर रुपयाच्या नाण्याच्या एका बाजूस राष्ट्रीय चिन्ह तसेच दुसऱ्या बाजूला भारतमातेचे चित्र, सिंह व तिच्यासमोर नतमस्तक झालेले स्वयंसेवक दाखविण्यात आले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या इतिहासात प्रथमच भारतमातेचे चित्र भारतीय चलनावर दिसत आहे.
टपाल तिकिटावर नेमके काय?
या विशेष टपाल तिकिटावर १९६३च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या संघस्वयंसेवकांचे चित्र आहे. संघाच्या योगदानावर टपाल तिकिटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.