“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:35 IST2025-11-08T11:32:18+5:302025-11-08T11:35:07+5:30
Deputy CM Eknath Shinde In Bihar: बिहारमधून अनेक लोक कामासाठी मुंबईत येतात. बिहारी लोक कष्टाळू म्हणून ओळखले जातात, अनेक कामे करण्यात ते अग्रेसर आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
Deputy CM Eknath Shinde In Bihar: जे वोट चोरीचा आरोप करतात, त्यांनी त्यांच्या राजकारणात नोट चोरी केली आहे. काँग्रेसने नेहमीच देशाची फसवणूक केली आणि आता हार पत्करण्याची तयारी करत आहेत. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे थियरीत पास, पण प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेत, असे हे लोक आज इतरांना राजकारण शिकवत फिरत, अशी टीका करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीएला समर्थन देण्याचे आवाहन केले.
बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील बाकरपूर विधानसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंह यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. एनडीए सरकारने मागील काही वर्षांत बिहारमध्ये अब्जावधी रुपयांच्या विकास प्रकल्पांना गती दिली आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, वीज, रस्ते, रेल्वे आणि सामाजिक कल्याण योजनांवर भर देण्यात आला. महिलांसाठीच्या ‘लाडली योजना’, सामाजिक सुरक्षा व आत्मनिर्भरतेच्या उपक्रमांमुळे बिहारमधील महिलांना नवे बळ मिळाले. त्यामुळे बिहारला विकासाच्या मार्गावर घेऊन जायचे तर पुन्हा एकदा राज्यात डबल इंजिन सरकारला संधी द्यावी लागेल, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा
एनडीए मधील पाच घटक पक्ष हे पाच पांडव असून, विरोधक म्हणजे कौरव आहेत, त्यामुळे आता निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर या कौरवांचा संहार करा. एनडीएने लालूप्रसाद यादव यांच्या “जंगलराज”ला पूर्णविराम दिला आहे. बिहार पुन्हा त्या काळात जाऊ नये, म्हणून आगामी निवडणुकीत एनडीएच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. बिहारमधून अनेक लोक कामासाठी मुंबईत येतात. काही घटना वगळल्या तर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळते. मुंबईत बिहारएवढ्याच उत्साहात छठ पूजा साजरी केली जाते. बिहारी लोक कष्टाळू म्हणून ओळखले जातात, अनेक कामे करण्यात ते अग्रेसर आहेत. सर्व जण एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. जसे मुंबईत ते एनडीए सोबत राहतात तसेच बिहार मध्येही एनडीएचे हात बळकट करावे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असल्याने तिथे वेगाने विकास झाला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राला मोठी आर्थिक मदत केली. तशीच मदत बिहारला देऊन ते बिहारला सक्षम करतील. डबल इंजिन सरकार राज्याची वेगाने प्रगती करू शकते, त्यामुळे बिहारला प्रगतीकडे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचे हात मजबूत करावे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.