JD Vance India Visit : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स उद्या(दि.21 एप्रिल) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतील. या बैठकीपूर्वी काँग्रेसने सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकन भूमीवरून भारतीय नागरिकांना हद्दपार केले जात आहे. बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचा नाश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी या बैठकीत भारताच्या चिंता मांडतील का? असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान मोदी भारतीय विद्यार्थ्यांच्या चिंतांवर चर्चा करतील का? पंतप्रधान मोदी पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेच्या माघारबद्दल भारताच्या चिंता व्यक्त करतील का? द्विपक्षीय व्यापारातील बदलांचा भारतावर परिणाम होऊ नये, पंतप्रधान यावर चर्चा करतील का? असेही काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले.
जेडी व्हान्स चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स सोमवारी त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा आणि तीन मुलांसह चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या संध्याकाळी पंतप्रधान मोदींना भेटतील. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, सुरक्षा आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल.
अनेक मुद्द्यांवर चर्चा होणारअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच 60 देशांविरुद्ध कर जाहीर केले आहेत. सध्या भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत. अशा परिस्थितीत जेडी व्हेन्सच्या या दौऱ्यात व्यापार कराराच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.