इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:06 IST2025-09-21T06:05:32+5:302025-09-21T06:06:09+5:30
मोदी यांच्या हस्ते सुमारे ३४,२०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले

इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
भावनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जनतेला स्वयंपूर्णतेची हाक दिली. इतर देशांवर असलेले आपले परावलंबित्व हाच देशाचा खरा शत्रू असल्याचे ते म्हणाले. सेमीकंडक्टरपासून जहाजापर्यंत प्रत्येक वस्तू स्वदेशात उत्पादित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भावनगरच्या गांधी मैदानात आयोजित ‘समुद्रापासून समृद्धी’ या संकल्पनेवर आधारित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. विश्व बंधुत्वाच्या भावनेने भारत वाटचाल करीत असल्याचे सांगून जगात भारताचा कुणीच शत्रू नाही; परंतु, इतर देशांवर असलेले अवलंबित्व हाच मुख्य शत्रू असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोदी यांच्या हस्ते सुमारे ३४,२०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. यातील ७,८७० कोटी रुपयांच्या योजना सागरी क्षेत्राशी संबंधित आहेत.
मुंबईतील अत्याधुनिक क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी गुजरात दौऱ्यादरम्यान आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सागरी पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी उभारलेल्या अत्याधुनिक अशा मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचे व्हर्चुअली उद्घाटन केले. हे देशातील सर्वांत मोठे क्रूझ टर्मिनल आहे. भारतीय क्रूझ पर्यटनाचे ‘गेटवे’ म्हणून ते ओळखले जाईल. रोज १० हजार प्रवासी थांबवण्याची व्यवस्था येथे असेल. शिवाय, ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटरच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा मिळेल.