ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:24 IST2025-07-14T09:21:13+5:302025-07-14T09:24:50+5:30
Brahmos Missile : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली.

ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
भारत आणि पाकिस्तान दरम्यान मे महिन्यात झालेल्या संघर्षात ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली. या मिसाइलची ताकद अवघ्या जगाने पाहिली. ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत भारताने ब्रह्मोस मिसाइल वापरून पाकिस्तानवर हल्ला केला होता. या मिसाइलची अभूतपूर्व कामगिरी पाहिल्यानंतर आता जगभरातून तिची मागणी वाढली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तब्बल १४-१५ देशांनी ब्रह्मोस मिसाइल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाइलची भूमिका निर्णायक होती. याच कारणामुळे, तेव्हापासून आतापर्यंत डझनहून अधिक देशांनी ब्रह्मोस मिसाइलमध्ये रुची दाखवली आहे आणि त्यांना ती खरेदी करायची आहे."
१४-१५ देश रांगेत!
त्यांनी पुढे सांगितलं, "काही दिवसांपूर्वीच, मी लखनऊमध्ये ब्रह्मोस एअरस्पेस इंटिग्रेशन आणि चाचणी केंद्राचं उद्घाटन केलं. तुम्ही पाहिलं असेल की, ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाइलने चमत्कारी काम केलं आहे आणि एवढंच नाही, तर ब्रह्मोस मिसाइलच्या या 'चमत्कारानंतर' जगातील जवळपास १४-१५ देशांनी भारताकडे ब्रह्मोस मिसाइलची मागणी केली आहे."
राजनाथ सिंह म्हणाले, "ब्रह्मोस मिसाइलची निर्यात आता लखनऊमधूनही केली जाईल. मला विश्वास आहे की ही सुविधा संरक्षण क्षेत्रात आपल्या देशाच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देईल आणि त्याचबरोबर रोजगारही निर्माण करेल. लखनऊसोबतच राज्याचाही वेगाने विकास व्हावा यासाठी इथे आणखी उद्योग यावेत, हा माझा प्रयत्न आहे."
ब्रह्मोस केवळ मिसाइल नाही, तर आत्मविश्वासाची ओळख!
संरक्षण मंत्र्यांच्या मते, ब्रह्मोस ही आता केवळ एक मिसाइल राहिली नसून, ती भारताच्या सैन्य आत्मविश्वासाची ओळख बनली आहे. ऑपरेशन सिंदूरमधील तिच्या कामगिरीने जग थक्क झालं आहे. भारत आता केवळ संरक्षण सामग्री आयात करणारा देश राहिला नसून, एक जागतिक संरक्षण निर्यातदार बनत आहे.
मजबूत पायाभूत सुविधांमुळे ऐतिहासिक बदल : राजनाथ सिंह
राजनाथ सिंह यांनी दावा केला की, मजबूत कायदा-सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या बळावर उत्तर प्रदेश अधिकाधिक उद्योगांना आकर्षित करत आहे. ते म्हणाले, "पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल होत आहेत. एक्सप्रेस-वे, विमानतळ, मेट्रो, मेडिकल कॉलेज - हे सर्व विकासाचं एक नवीन चित्र सादर करत आहेत."