Delhi Violence: रस्ते निर्मनुष्य, तणाव मात्र कायम; दगडफेक, आगीच्या तुरळक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 06:59 IST2020-02-27T03:02:52+5:302020-02-27T06:59:13+5:30
कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.

Delhi Violence: रस्ते निर्मनुष्य, तणाव मात्र कायम; दगडफेक, आगीच्या तुरळक घटना
- विकास झाडे
नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांत हिंसाचाराने २४ बळी घेतले. पोलीस व निमलष्करी दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याचे चित्र असले तरी गल्लीबोळात धग कायम आहे. कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.
या भागात फेरफटका मारताना पुढच्या क्षणी काय होईल? अशी भीती मनात असते. प्रत्येकाचीच अशी अवस्था आहे. सोनिया विहार, गोकुळपुरी भागातील एका टायरच्या व भंगार दुकानांना आज आगी लावण्यात आल्या. जाफराबाद, कबीरनगर, विजयपार्क, मौजपुर, करावल नगर इथेही काहीशी दगडफेक झाली. उपद्रवी व असामाजिक व्यक्तींकडून सोशल मीडियात हिंसाचाराच्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात असल्याने हिंसाचार होत आहे.
ईशान्य दिल्लीतील हिंसाग्रस्त भागात बुधवारी सकाळी पोलीस व निमलष्करी दलाचा फ्लॅगमार्च झाला. तिथे सशस्त्र पोलीस आहेत. शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या, दंगलविरोधी ‘वज्र’ वाहन आणि आकस्मिक मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. रस्ते निर्मनुष्य आहेत. सर्वत्र जाणवतो केवळ तणावच. हिंसाचाराच्या भीतीने लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत. गल्लीबोळात मात्र ते गटांमध्ये दिसून येत आहेत. मौजपूरजवळील कबीरनगर परिसरात दोन दिवस जाळपोळ झाली. समाजकंटकांनी घरे व दवाखान्यांच्या खिडक्यांचा चुराडा केल्याने तिथे दहशत आहे. मंगळवारी इथे गोळीबार करण्यात आला. दोनशेवर लोक जखमी झाले आहेत. त्यामुळेच आज पोलिसांचा बंदोबस्त अगदी चोख होता.
शांततेसाठी आवाहन!
सर्वाधिक हिंसा झालेल्या जाफराबाद येथील मस्जिदीतून बुधवारी सायंकाळी शांततेचे आवाहन करण्यात आले. मुस्लिमांनी हिंसाचारात सहभागी होऊ नका, घराबाहेर पडू नका आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे करा, असे हे आवाहन होते.
मंगळवारी रात्री असंख्य तरूण या भागात लोखंडी सळाखी, चाकू, लाठ्या घेऊन गल्लीबोळात फिरत होते. या मस्जिदीसमोर राहणारे ताहीर म्हणाले, आम्हाला हिंसा नको, सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.