अरे देवा! परीक्षा टाळण्यासाठी विद्यार्थ्याचा २००० किमी प्रवास; झोपडपट्टीत राहून केली मजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:47 IST2025-03-04T10:45:55+5:302025-03-04T10:47:07+5:30
विद्यार्थ्याने ट्रेन पकडली आणि २००० किलोमीटरचा प्रवास करून बंगळुरूला पोहोचला.

AI फोटो
मुलांना बऱ्याचदा अभ्यास आवडत नाही. त्यामुळे ते त्यापासून सुटका मिळवण्याचे मार्ग शोधू लागतात. दिल्लीतील एका प्रसिद्ध ठिकाणी शिकणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्याने असंच काहीसं केलं आहे. परीक्षा टाळण्यासाठी तो घरातून पळून गेला.
विद्यार्थ्याने ट्रेन पकडली आणि २००० किलोमीटरचा प्रवास करून बंगळुरूला पोहोचला. मग तिथून बस आणि ऑटोने कृष्णगिरीला पोहोचला. अभ्यास करावा लागू नये म्हणून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तिथे झोपडीत राहू लागला.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की त्यांचा १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा कुठेतरी गेला आहे. घराबाहेर पडताना त्याने त्याच्या वडिलांना एक मेसेज पाठवला होता. मी घरातून जात आहे आणि मला शोधण्याचा कोणताही प्रयत्न करू नये असं मेसेजमध्ये लिहिलं होतं.
मुलगा अल्पवयीन होता, म्हणून वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि मुलाचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केलं. तपासादरम्यान, पोलिसांना कळलं की तो मुलगा तामिळनाडूमध्ये आहे. तो मुलगा ट्रेनने आधी बंगळुरूला पोहोचला होता. त्यानंतर पोलिसांचं पथक ताबडतोब बंगळुरूला गेलं. तिथून माहिती गोळा केल्यानंतर, पोलिसृी पथक कृष्णागिरी येथे पोहोचले जिथून निर्मल दिन साईड येथे मुलगा सापडला.
तो मुलगा तिथल्या एका झोपडपट्टीत राहत होता आणि रोजंदारीवर काम करायचा. तपासादरम्यान, पोलिसांना कळलं की, १७ वर्षांचा मुलगा अकरावीत शिकत होता. पण त्याला परीक्षा द्यायची नव्हती. म्हणून, २१ फेब्रुवारी रोजी तो घरातून निघाला आणि थेट बंगळुरूला गेला आणि नंतर कृष्णागिरीला पोहोचला. पोलिसांनी मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं आणि मुलाचं समुपदेशनही करण्यात आलं आहे.