दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 08:31 IST2025-11-11T07:27:13+5:302025-11-11T08:31:39+5:30
दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
Delhi Blast: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी झालेल्या एका भीषण कार स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ घडलेल्या या स्फोटात आतापर्यंत किमान ८ लोकांचा मृत्यू झाल्याची आणि अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हा अपघात मानला जात असला तरी, आता या घटनेचा तपास संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणून केला जात आहे, ज्यामध्ये स्फोटकांनी भरलेली एक हुंदाई आय-२० कार जाणीवपूर्वक उडवण्यात आल्याचे तपासकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
हा स्फोट सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी झाला, ज्यामुळे परिसरात आग लागली आणि आजूबाजूच्या अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की, जवळच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि रस्त्यावरील दिवेही बंद पडले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटानंतर रस्त्यावर मानवी शरीराचे अवयव फेकले गेले होते. जखमींवर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
CCTV फुटेजमध्ये दिसला संशयित 'आय-२०' कार आणि 'मास्क' घातलेला ड्रायव्हर
या थरारक घटनेनंतर काही मिनिटे आधीचे एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये, स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची आय-२० कार अत्यंत गजबजलेल्या रस्त्यातून जाताना दिसत आहे. या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर काळ्या रंगाचा मास्क घातलेला जो व्यक्ती बसलेला दिसत आहे, तोच मोहम्मद उमर नावाचा दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. संशयित वाहन आणि मास्क घातलेल्या ड्रायव्हरची ओळख पटवण्यासाठी तपास यंत्रणा आता सखोल चौकशी करत आहेत.
पुलवामा कनेक्शनची शक्यता
ज्या ह्युंदाई आय-२० कारमध्ये हा स्फोट घडवण्यात आला, त्या कारच्या मालकी संशयास्पद आहे. मोहम्मद सलमानच्या नावावर असलेली ही कार अनेकदा विकली गेली होती. सलमानने ती नदीमला, त्यानंतर फरीदाबादच्या एका कार डिलरला दिली. तेथून तारिकने ती खरेदी केली आणि शेवटी ती उमरकडे आली होती. कार खरेदी करणारा तारिक हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी असून, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तपासकर्ते आता फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलशी त्याचे संबंध तपासत आहेत.
हा हल्ला 'फिदायिन-स्टाईल' ऑपरेशनसारखा दिसत असून, गर्दीच्या ठिकाणी आणण्यापूर्वीच कारमध्ये विस्फोटकेरी भरली गेली होती, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. दिल्लीसह एनसीआरमध्येही हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.