Delhi News: मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या एका व्यापाऱ्याची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने राजधानी दिल्ली हादरली आहे. व्यापाऱ्यावर ७-८ गोळ्या झाडण्यात आल्या. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी आधी व्यापाऱ्याची गाडी थांबवली आणि नंतर गोळ्या झाडल्या. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, अरविंद केजरीवाल यांनी या घटनेनंतर केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सुनील जैन असे हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते भांड्यांचे व्यापारी होते. शाहदराचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, फर्श बाजार पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याबद्दलचा कॉल आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी ५२ वर्षीय सुनील जैन हे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.
यमुना स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये ते सकाळी फिरायला गेले होते. मॉर्निंग वॉक करून घरी निघाले होते. रस्त्यात एका मोटारसायकलवरून दोघे त्यांच्याजवळ आले आणि गोळ्या झाडल्या. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
केजरीवालांची अमित शाहांवर टीका
अरविंद केजरीवाल यांनी या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. "अमित शाहांनी दिल्लीला उद्ध्वस्त केलं आहे. दिल्लीला जंगल राज बनवून टाकलं आहे. सगळीकडे लोक दहशतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. भाजपला आता दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था सांभाळली जात नाहीये. दिल्लीकरांना एकजुटीने आवाज उठवावा लागेल", अशी टीका केजरीवालांनी केली आहे.
सुनील जैन यांच्यावर ७-८ राऊंड फायर करण्यात आले. त्यामुळे त्यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला. घटनास्थळी रक्ताचे डाग दिसत होते. ज्या गाडीवरून सुनील जैन घरी निघाले होते, ती गाडी खाली पडलेली होती. जैन यांची हत्या कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.