दारुड्या शिक्षकाची फूड डिलिव्हरी एजंटसोबत गैरवर्तन; ऑर्डर हिसकावली, पैसेही दिले नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:20 IST2025-10-01T17:19:39+5:302025-10-01T17:20:14+5:30
Drunk Teacher Abuses Food Delivery Agent: उत्तर दिल्लीच्या नरेला परिसरातून एका शिक्षकाच्या गैरवर्तनाची धक्कादायक घटना समोर आली.

दारुड्या शिक्षकाची फूड डिलिव्हरी एजंटसोबत गैरवर्तन; ऑर्डर हिसकावली, पैसेही दिले नाहीत!
उत्तर दिल्लीच्या नरेला परिसरातून एका शिक्षकाच्या गैरवर्तनाची धक्कादायक घटना समोर आली. दारूच्या नशेत शिक्षकाने फूड डिलिव्हरी एजंटशी गैरवर्तन केले, त्याची ऑर्डर हिसकावून घेतली आणि पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी डिलिव्हरी एजंटने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली. डिलिव्हरी एजंटने दिलेल्या तक्रारीनुसार, दोन पुरुषांनी ऑनलाइन जेवण ऑर्डर केले. डिलिव्हरी एजंट ऑर्डर घेऊन पोहोचल्यावर, एका व्यक्तीने दारूच्या नशेत डिलिव्हरी एजंटशी शिवीगाळ आणि गैरवर्तन केले. तसेच त्याच्याकडून ऑर्डर हिसकावून घेतली आणि डिलिव्हरीचे पैसे देण्यास नकार दिला.
डिलिव्हरी एजंटने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांचे पथक घटनास्थळी संबंधित व्यक्तीला शांत राहण्याचा सांगितले. परंतु, त्याने पोलिसांचे आदेश पाळण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूच्या नशेत असल्याची पुष्टी झाली.
विशेष म्हणजे, रुग्णालयात त्याने आपली ओळख लपवण्यासाठी स्वतःचे नाव 'राम कुमार' असे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याची खरी ओळख 'ऋषी कुमार' अशी पटली, जो शिक्षक आहे. पोलिसांनी सांगितले की, डिलिव्हरी एजंटला इतर डिलिव्हरी देण्यासाठी घाई असल्याने तो त्यावेळी औपचारिक तक्रार दाखल करू शकला नाही. त्यामुळे, पोलिसांनी ऋषी कुमार यांना समुपदेशन करून त्याला घरी पाठवले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.