दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:27 IST2025-11-11T12:27:03+5:302025-11-11T12:27:55+5:30
Delhi Red Fort Car Blast Updates: सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट घडवून आणण्यात आला

दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Delhi Red Fort Car Blast Updates: भारताची राजधानी दिल्ली येथे सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ चालत्या कारमध्ये स्फोट झाल्याने देश हादरला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आणि दिल्ली पोलिस, फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब निकामी करणारे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि विविध तपास यंत्रणांच्यामार्फत सध्या तपास सुरू आहे. याचदरम्यान, राजकीय महत्त्वाच्या असलेल्या लाल किल्ल्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुढील तीन दिवस लाल किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
लाल किल्ला ३ दिवसांसाठी बंद
या घटनेनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव पुढील ३ दिवस लाल किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कोणत्याही पर्यटकांना किंवा नागरिकांना संकुलात प्रवेश दिला जाणार नाही. तपास आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डीसीपी उत्तर राजा बांठिया म्हणाले, "यूएपीए, स्फोटके कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तपास सुरू झाला आहे आणि दिल्ली पोलिस, एफएसएल आणि एनएसजीचे अनेक विशेष पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्य पुरावे गोळा करत आहोत."
वाहतुकीवर परिणाम, काही मार्ग बंद
दिल्ली वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षेसाठी आज (११ नोव्हेंबर) नेताजी सुभाष मार्गाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते आणि सेवा रस्ते बंद केले आहेत. चट्टा रेल कट ते सुभाष मार्ग कट पर्यंत कोणत्याही वाहनांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत सकाळी ६ वाजल्यापासून हे निर्बंध लागू राहतील. गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट
स्फोटानंतर लगेचच दिल्ली पोलिसांनी सर्व संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली. आयजीआय विमानतळ, इंडिया गेट, संसद भवन आणि सीमावर्ती भागात सुरक्षा तपासणी कडक करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे आणि पोलिसांनी लोकांना कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा हालचालींची त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.