Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:13 IST2025-11-12T09:11:25+5:302025-11-12T09:13:22+5:30
Dr. Shaheen Shahid confession, Delhi Red Fort Car Blast Updates: शाहीनचे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद सोबत कनेक्शन तपासात पुढे आले आहे. चौकशीदरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत.

Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
Dr. Shaheen Shahid confession, Delhi Red Fort Car Blast Updates: भारताची राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात १०हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर २०हून जास्त जण जखमी आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातील विविध सुरक्षा तपास यंत्रणा छापेमारी करत आहेत आणि स्फोटात सहभागी असलेल्यांचा शोध घेत आहेत. तपास यंत्रणांनी या स्फोटानंतर डॉ. शाहीन शाहिद हिला अटक केली आहे. शाहीनचे दहशतवादी संघटना जैशसोबत कनेक्शन तपासात पुढे आले होते. चौकशीदरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत.
दोन वर्षांपासून स्फोटकं जमवण्याचे काम सुरू होते!
भारतातील जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ. शाहीन शाहिद गेल्या दोन वर्षांपासून स्फोटके साठवत होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शाहीन शाहिदची सतत चौकशी केली जात आहे. असे मानले जाते की या चौकशीतून आणखी बडे खुलासे होऊ शकतात. दिल्ली स्फोटाबाबत शाहीनची विशेष चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तिने कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने म्हणायचा की, देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे आहेत. तसेच शाहिन, मुजम्मिल आणि आदिल यांच्यासह सारेच दोन वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटके गोळा करत होते. हे सर्व जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केले जात होते.
डॉ. उमर दिल्ली स्फोटाचा 'मास्टरमाईंड'
सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या आय२० कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून बाहेर पडताना काळा मास्क घातलेला एक माणूस गाडीत बसलेला दिसला. तो डॉ. उमर मुहम्मद नबी असल्याचे सांगितले जात आहे. तो काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी होता. दिल्ली स्फोटानंतर फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. येथून ७ डॉक्टरांसह १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे.