दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 21:48 IST2025-11-16T21:48:17+5:302025-11-16T21:48:57+5:30
NIA ला उमरच्या दुसऱ्या एका जप्त केलेल्या कारमधून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि काही आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत.

दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
दिल्लीतीललाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार ब्लास्ट प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आत्मघाती हल्लेखोर उमर उन नबीच्या एका जवळच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. अमीर राशिद अली (Ameer Rashid Ali) असे त्याचे नाव असून, त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. म्हत्वाचे म्हणजे, या आत्मघाती हल्ल्यात वापरलेली i-20 कार अमीर राशिदच्या नावावर होती, असे NIA च्या तपासात उघड झाले आहे.
अमीर हा कश्मीरमधील संबुरा, पंपोर येथील रहिवासी आहे. त्याने उमर उन नबीसोबत मिळून संपूर्ण स्फोटाचा कट रचला होता. कार खरेदी करण्यासाठी मदतीच्या हेतूने अमीर काही दिवसांपूर्वी दिल्लीत आला होता, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. फॉरेन्सिक अहवालातून, आत्मघातकी हल्लेखोर उमर उन नबी हाच होता, हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. उमर उन नबी पुलवामाचा रहिवासी होता, तो अल-फलाह विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होता.
उमरच्या दुसऱ्या कारमधून काय काय मिळालं? -
NIA ला उमरच्या दुसऱ्या एका जप्त केलेल्या कारमधून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि काही आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या या घटनेत १३ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण जखमी झाले होते.
आंतरराज्यीय नेटवर्क आणि विदेशी कनेक्शन समोर -
या प्रकरणी NIA ने आतापर्यंत ७३ हून अधिक साक्षीदारांची चौकशी केली आहे, यात जखमींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तपास आता अनेक राज्ये आणि काही देशांपर्यंत पोहोचला आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांसोबत NIA चे कोऑर्डिनेशनही वाढले आहे. तपास पथक मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी आणि हल्ल्याच्या मास्टरमाइंडला पकडण्यासाठी अनेक राज्यांमध्ये छापे टाकत आहे. या केसमध्ये अनेक आंतरराज्यीय नेटवर्क आणि विदेशी कनेक्शन समोर आले आहेत, ज्यांचा सखोल तपास सुरू आहे.