लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:26 IST2025-11-12T06:25:54+5:302025-11-12T06:26:30+5:30
Delhi Red Fort Blast Update: लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर एलएनजेपी रुग्णालयाबाहेर मंगळवारी पहाटेपासूनच अश्रूंनी भरलेले डोळे अन् मनात असलेले कुटुंबीय यांच्या प्रतीक्षेत दिसत होते. रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा कडक होती, पण त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या शेकडो कुटुंबीयांची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल, अशी स्थिती होती.

लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
नवी दिल्ली - लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर एलएनजेपी रुग्णालयाबाहेर मंगळवारी पहाटेपासूनच अश्रूंनी भरलेले डोळे अन् मनात असलेले कुटुंबीय यांच्या प्रतीक्षेत दिसत होते. रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा कडक होती, पण त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या शेकडो कुटुंबीयांची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल, अशी स्थिती होती.
काहींनी हातात फोटो धरले होते, काही फोनकडे नजरा टाकत होते. एकच प्रश्न होता... “आमचा माणूस कुठे आहे?” स्फोटातील मृतदेहांचे तुकडे, आतडे बाहेर आलेली शरीरे पाहून शवागृहातील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले होते.
कालच चहा पित होतो... : नौमान नावाचा तरुण यात ठार झाला. त्याचे कुटुंब सकाळी शव ओळखल्यानंतर शांतपणे ॲम्ब्युलन्सच्या मागे चालत होते. नौमानचा मित्र सोनू शवागृहाबाहेर बसला होता. आत जाण्याची त्याची हिंमतच झाली नाही. “कालच आम्ही चहा पित होतो, आज मला त्याला तुकड्यांमध्ये पाहायला सांगताहेत...” एवढंच तो म्हणू शकला.
‘जिवंत आहे की नाही?’
एका महिलेनं रडत रडत सांगितले, “आम्ही रात्रीपासून आहोत. एक शब्द तरी सांगा, जिवंत आहे की नाही...” आत रुग्णालयात डॉक्टर जखमींची काळजी घेत होते, तर बाहेर प्रतीक्षा, व्याकुळता आणि आशा-निराशेच्या गर्तेत सापडलेली कुटुंबे होती.