Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:17 IST2025-11-11T16:15:53+5:302025-11-11T16:17:06+5:30
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या प्रकरणात दिनेश आणि देवेंद्र ही दोन नावे देखील समोर आली आहेत.

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटामुळे अवघ्या देश हादरून गेला आहे. या भीषण स्फोटात तब्बल १० जणांनी आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या असून, एजन्सी या प्रकरणाचा तापस करत आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला. या प्रकरणात दिनेश आणि देवेंद्र ही दोन नावे देखील समोर आली आहेत. हे दोघे कोण आहेत आणि यांचे या स्फोटाशी काय कनेक्शन आहे, हे देखील आता समोर आले आहे.
दिनेश आणि देवेंद्र हे थेट या स्फोटाशी संबंधित नसले, तरी स्फोट झालेल्या गाडीशी त्यांचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. ज्या 'आय २०' कारमध्ये स्फोट झाला ती कार देवेंद्र याने खरेदी केली होती. देवेंद्र हा ओखलाचा रहिवासी असून, त्याने दीड वर्षांपूर्वी ही गाडी खरेदी केली होती. तर, ही कार दिनेश नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती. त्याचे घर गुरुग्राम येथील शांतीनगरमध्ये आहे. मात्र, या दोघांचाही या स्फोटाशी काही संबंध असल्याचे समोर आलेले नाही.
कारचे पुलवामाशी आहे कनेक्शन!
स्फोट झालेली कार ही पुलवामाचा डॉ. उमर चालवत होता. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही संशयिताच्या आईला डीएनए नमुने देण्यासाठी बोलावले आहे, स्फोटस्थळी सापडलेल्या शरीराच्या अवयवांशी ते जुळणारे आहे का हे तपासले जाईल." डॉ. उमर नबी कथितपणे आय२० कार चालवत होता. तो पुलवामातील कोइल गावात राहत होता. या स्फोटात वापरलेल्या कारच्या खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या तीन लोकांनाही आता चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी स्फोट झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर असे आढळून आले की, ही कार पहाटे ३:१९ वाजता पार्क करण्यात आली होती आणि नंतर तीन तासांनंतर सकाळी ६:४८ वाजता पार्किंगमधून बाहेर काढण्यात आली होती.
सध्या, पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. गाडीत कोण होते, ती कोणी पार्क केली आणि ती घेण्यासाठी कोण आले हे शोधण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून गाडी कुठून निघाली, ती प्रथम लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये कुठे आली आणि नंतर ती पार्किंगमधून कशी निघून लाल किल्ल्यासमोरील कशी पोहोचली हे देखील शोधले जात आहे.