"कान्हा तेरी यमुना काली हो गई…", आप सरकारविरोधात भाजपकडून आरोपपत्र जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:16 IST2024-12-23T14:16:00+5:302024-12-23T14:16:55+5:30
Delhi polls : भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले.

"कान्हा तेरी यमुना काली हो गई…", आप सरकारविरोधात भाजपकडून आरोपपत्र जारी
नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे सत्ताधारी आप सरकारकडून महिला आणि वृद्धांसाठी दोन योजना सुरू केल्या जात आहेत. त्याचवेळी भाजपने आप सरकारविरोधात आरोपपत्र जारी केले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि प्रवीण खंडेलवाल या भाजप नेत्यांनी एका कार्यक्रमात हे आरोपपत्र जाहीर केले. यावेळी विजेंद्र गुप्ता, रमेश बिधुरी, आरती मेहरा आणि सरदार आरपी सिंह यांसारखे इतर मोठे नेतेही उपस्थित होते.
भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले. अनुराग ठाकूर म्हणाले की, "आप सरकारने यमुना नदी इतकी प्रदूषित केली आहे की, ती दुर्गंधीयुक्त, फेसाळ आणि विषारी झाली आहे. मला आठवते २०२२ मध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले होते की पुढच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच २०२५ च्या निवडणुकीपूर्वी ते लोकांसोबत यमुना नदीत डुबकी मारतील."
याशिवाय, १० वर्षे झाली आणि २०२५ मध्ये जायला फक्त १० दिवस उरले आहेत, यमुना स्वच्छ झाली का? असा सवाल सुद्धा अरविंद केजरीवाल यांना केला आहे. तसेच, 'कान्हा तेरी यमुना काली हो गई, केजरीवाल के पाप धोते-धोते', असे म्हणत अनुराग ठाकूर यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. अनुराग ठाकूर म्हणाले की, यमुना आता इतकी प्रदूषित झाली आहे की, येथे सण साजरे करणेही बंद झाले आहे. वायुप्रदूषण आणि खराब सांडपाणी व्यवस्थेमुळे दिल्ली गॅस चेंबर बनली आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होत आहेत. पाणी प्रदूषित झाले आहे. आज दिल्ली वाचवण्याची आणि अरविंद केजरीवाल यांचा भ्रष्टाचार संपवण्याची वेळ आली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्याकडून प्रत्युत्तर!
दरम्यान, भाजपने 'आप' सरकारविरोधात आरोपपत्र जारी केल्यावर आप प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपकडे निवडणूक लढवण्याचा कोणताही अजेंडा नाही. गेल्या ५ वर्षांत दिल्लीसाठी काय केले, हे त्यांनी दिल्लीतील जनतेला सांगावे. वीज, पाणी, महिलांचा प्रवास, रस्ते आणि इतर अनेक बाबतीत आपने दिल्लीच्या लोकांसाठी खूप काही केले आहे. तसेच, या लोकांनी काय काम केले आहे? दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. आता ते निवडणुकीसाठी आले असताना माझ्यावर आरोपपत्र जारी करत आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री चेहरा नाही, असे केजरीवाल म्हणाले.