दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:31 IST2025-12-17T17:29:28+5:302025-12-17T17:31:19+5:30
दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या पिकअप ट्रकच्या चालकाला झोप लागल्याने भीषण अपघात झाला.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर मंगळवारी रात्री एक भयंकर अपघात झाला आहे. दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या पिकअप ट्रकच्या चालकाला झोप लागल्याने भीषण अपघात झाला. चालकाने बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. पण केबिनमधील तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अपघाताच्या वेळी चालक वगळता सर्वजण झोपले होते.
आगीचे लोट पाहून लोकांनी एक्स्प्रेस वे प्रशासनाला माहिती दिली. एक पेट्रोलिंग टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचली आणि जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात नेलं. चालकाने सांगितलं की त्याच्यासोबत गाडीत आणखी तीन जण होते आणि गाडी चालवताना त्याला अचानक झोप लागली.
रैनी पोलीस स्टेशनचे एसएचओ राजपाल चौधरी यांनी सांगितलं की, पिकअपमध्ये सीएनजी किट होतं. पुढच्या चाकातून निघालेल्या ठिणगीमुळे सीएनजी लाईन पेटली. पिकअपमधील एका लहान एलपीजी सिलेंडरचाही स्फोट झाला, ज्यामुळे आग आणखी भडकली.
हरियाणातील बहादूरगडचा रहिवासी असलेला मोहित, मध्य प्रदेशातील सागरचा रहिवासी असलेला दीपेंद्र आणि मध्य प्रदेशातील सागरचा रहिवासी असलेला पदम यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमी चालक हनी हा हरियाणातील झज्जर येथील रहिवासी आहे, त्याला प्राथमिक उपचारानंतर गंभीर अवस्थेत जयपूर येथे रेफर करण्यात आलं.
दीपेंद्र आणि पदम वेल्डिंगचे काम करत होते आणि काम संपवून साहित्य घेऊन मध्य प्रदेशला परतत होते. अपघात इतका भीषण होता की, मृतदेह जळालेले होते आणि सीटवर अडकलेले आढळले. मृतदेह काढण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला. क्रेनने गाडी बाहेर काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.