Delhi MCD Result 2022: MCD मधील विजयानंतर केजरीवालांना आहे 2 गोष्टींची आवश्यकता, PM मोदींकडेही मागितला आशीर्वाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 17:25 IST2022-12-07T17:24:01+5:302022-12-07T17:25:18+5:30
"एवढ्या मोठ्या विजयाबद्दल मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. आज त्यांनी आम्हाला महापालिकेचीही जबाबदारी दिली आहे. दिल्लीच्या जनतेने दिलेल्या या प्रेमाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही"

Delhi MCD Result 2022: MCD मधील विजयानंतर केजरीवालांना आहे 2 गोष्टींची आवश्यकता, PM मोदींकडेही मागितला आशीर्वाद!
आम आदमी पक्षाने एमसीडीच्या निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेल्या 15 वर्षांपासून एमसीडीवर सत्ता गाजविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आम आदमी पक्षाने बाजूला करत हा विजय मिळविला आहे. याप्रसंगी पक्षाच्या कार्यालयात बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, "एवढ्या मोठ्या विजयाबद्दल मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. आज त्यांनी आम्हाला महापालिकेचीही जबाबदारी दिली आहे. दिल्लीच्या जनतेने दिलेल्या या प्रेमाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही"
केजरीवाल म्हणाले, "आतापर्यंत त्यांनी आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्ण केली आहे. आम्हाला शाळेची जबाबदारी दिली, आम्ही शाळा सुरळीत करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. लोकांनी आम्हाला रुग्णालयांची जबाबदारी दिली, आम्ही दिवसरात्र मेहनत करून रुग्णालये व्यवस्थित केले, चांगल्या उपचारांची व्यवस्था केली. जनतेने आम्हाला विजेची जबाबदारी दिली, आम्ही २४ तास मोफत वीज दिली. आज दिल्लीच्या जनतेने आपल्या मुलाकडे, आपल्या भावाकडे स्वच्छतेची जबाबदारी दिली आहे. भ्रष्टाचार दूर करण्याची जबाबादरी दिली आहे. उद्याने व्यवस्थित करण्याची जबाबदारी दिली आहे. एवढेच नाही, त अशा अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. एवढे प्रेम दिले आहे, एवढा विश्वास ठेवला आहे, याचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, आपला हा विश्वास कायम रहावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन."
'सर्वांचे सहकार्य हवे' -
अरविंद केजरीवाल म्हणाले, "सर्वांना एकत्रितपणे काम करायचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो, की राजकारण आतापर्यंत होते. आता सर्वजण मिळून दिल्ली व्यवस्थीत करूया. यात, भाजप, काँग्रेस, सर्वांकडूनच मदतीची अपेक्षा आहे. 250 नगरसेवक जे निवडून आले आहेत, त्यांनाही मी विनंती करतो, की आपण सर्वजण मिळून दिल्ली व्यवस्थित करूया. मी सर्व पक्षांकडूनही सहकार्याची अपेक्षा करतो."
'केंद्र सरकारकडून सहकार्याची आवश्यकता' -
केजरीवाल म्हणाले, "ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे खूप खूप आभार. मात्र, ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मी सांगू इच्छितो, की आम्ही आधी तुमची कामे करू आणि मग इतरांची कामे करू. आपल्याला दिल्ली व्यवस्थित करायची आहे. यासाठी सर्वांची मदत हवी आहे. प्रामुख्याने केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आज या व्यासपीठावरून मी केंद्र सरकारकडे आणि विशेषत: पंतप्रधानांकडे दिल्ली व्यवस्थित करण्यासाठी आशीर्वाद मागत आहे."