दिल्लीतल्या तरुणाचा सनबर्न फेस्टिवलमध्ये मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 11:46 IST2024-12-30T11:46:38+5:302024-12-30T11:46:47+5:30
गोव्यातील सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलमध्ये दिल्लीतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीतल्या तरुणाचा सनबर्न फेस्टिवलमध्ये मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरु
Sunburn Festival: गोव्यातील धारगल गावात आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिवलदरम्यान दिल्लीतील एका तरुणाचा मृत्यू झाला. सनबर्न फेस्टिवलच्या पहिल्याद दिवशी तरुणाचा आकस्मित मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण कश्यप (२६) असे मृत तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील रोहिणी भागातील रहिवासी होता. शनिवारी रात्री ९.४५ वाजता ही घटना घडली. सनबर्न फेस्टिवलदरम्यान करण कश्यप अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने म्हापसा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये तरुणाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा कट किंवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पुढील कारवाई केली जाईल. घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली.
सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल, आशियातील सर्वात मोठा आणि जगातील ११ वा क्रमांकाचा म्युझिक फेस्टिवल आहे. २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत सनबर्न फेस्टिव्हल गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. यासाठी उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली होती. २०२४ ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आयोजित सनबर्न पार्टीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती.
सनबर्न गोवा फेस्टिव्हलमध्ये देशभरातील आणि जगभरातील प्रसिद्ध कलाकार आले आहेत. अॅलेसो (स्वीडन), स्क्रिलेक्स, पेगी गौ (दक्षिण कोरियातील), KSHMR (भारत) आणि ARGY यांच्यासह दिग्गज कलाकार या फेस्टिवलमध्ये सहभागी झाले आहेत. या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी एक दिवसाचे तिकीट ४००० रुपयांपासून सुरू होणार आहे. तीन दिवसांच्या प्रवेशासाठी टेबल तिकिटांची किंमत १५,००० रुपये आहे.