Corona Virus : बापरे! कोणी व्हेंटिलेटरवर तर कोणी ऑक्सिजन सपोर्टवर; ‘या’ रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्ण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 15:14 IST2023-04-06T15:06:10+5:302023-04-06T15:14:04+5:30
Corona Virus : रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे, श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत आहे.

Corona Virus : बापरे! कोणी व्हेंटिलेटरवर तर कोणी ऑक्सिजन सपोर्टवर; ‘या’ रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्ण गंभीर
कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीतून कोरोनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांत 5000 हून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आता कोरोना जीवघेणा ठरत आहे. दिल्ली सरकारचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात कोरोनाचे अनेक रुग्ण दाखल आहेत, या सर्वांना ऑक्सिजनची गरज आहे. यापैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
दिल्ली एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच उर्वरित 9 रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
डॉ. सुरेश सांगतात की, रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे, श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत आहे. या सर्वांना ऑक्सिजनशिवाय श्वास घेण्यास त्रास होतो. प्रत्येकाची ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी असते. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल असलेल्या या रुग्णांना ऑक्सिजनचा आधार दिला जात आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांना कोविड पॉझिटिव्ह असल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णालयात आणण्यात आले होते, दाखल केल्यानंतर त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी म्हटले. यावेळी कोविड रूग्णांमध्ये ताप आणि खोकल्याची लक्षणे दिसून येत आहेत, परंतु गंभीर रूग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
एलएनजेपीचे एमडी डॉ. सुरेश सांगतात की, सध्या रुग्णालयात 450 कोविड डेडिकेटेड बेड आहेत, त्या सर्वांमध्ये ऑक्सिजनची सुविधा आहे. तर गंभीर रुग्णांसाठी 50 व्हेंटिलेटरचीही तरतूद आहे. गरज भासल्यास बेड किंवा आयसीयू आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाईल. दिल्ली सरकारच्या या रुग्णालयात कोविडचे सर्वाधिक बेड आहेत. कोरोनाच्या पूर्वीच्या लाटेमध्ये याला कोरोना डेडिकेटेड रुग्णालय बनवण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"