ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:02 IST2025-07-07T14:01:52+5:302025-07-07T14:02:53+5:30
Famous Beer Brands Missing : कधीही नाव न ऐकलेल्या ब्रँडच्या बिअर स्टॉकमध्ये, कारण काय समजून घ्या

ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
Famous Beer Brands Missing : देशाच्या राजधानीत सध्या एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. भारतात बनवल्या जाणाऱ्या बहुतेक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर आजकाल दुकानांमधून गायब आहेत. यामुळे, लोक नाईलाजास्तव अशा ब्रँडची बिअर पित आहेत, ज्यांचे नाव त्यांनी यापूर्वी कधीही ऐकले नसेल. तर काही लोक त्यांना हव्या असलेल्या ब्रँडची बिअर खरेदी करण्यासाठी नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद, एनसीआरपर्यंत जात आहेत. अशी विचित्र परिस्थिती ओढवण्यामागचे कारण काय समजून घेऊया.
दुकानदारांचे म्हणणे काय?
एनबीटीच्या तपासणीत लोकप्रिय ब्रँडच्या बिअर उपलब्ध नसल्याच्या सततच्या तक्रारी खऱ्या असल्याचे आढळून आले. पूर्व, दक्षिण, मध्य आणि उत्तर दिल्लीच्या विविध भागातील सुमारे डझनभर दुकानांवर केलेल्या या तपासणीत किंगफिशर, बडवाइजर, टुबोर्ग, हेवर्ड्स, कार्ल्सबर्ग आणि हंटर सारखे लोकप्रिय ब्रँड कुठल्याच दुकानांमध्ये आढळले नाहीत. बिरा आणि फोस्टरची बिअर देखील एक-दोन ठिकाणी मर्यादित प्रमाणात उपलब्ध होती. चौकशी केल्यावर दुकानदारांनी सांगितले की यापैकी बहुतेक ब्रँडचा स्टॉक दोन ते तीन आठवडे येतच नाही किंवा स्टॉक इतका कमी प्रमाणात आहे की तो काही तासांत संपतो.
भूतान आणि नेपाळ ब्रँडची बिअर उपलब्ध
भूतान आणि नेपाळमधून आयात केलेल्या सर्व ब्रँडच्या बिअर दिल्लीच्या दुकानांत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत भारतीय बिअरपेक्षा थोडी जास्त आहे. लोक या ब्रँड्सशी फारसे परिचित नाहीत. त्यामुळे त्या खरेदी करण्यास दिल्लीकर नापसंती दर्शवतात. पण नाईलाजास्तव काही मंडळी याच बिअर विकत घेत आहेत.
दुकादारांना मिळतोय जास्त नफा
तपासात असेही समोर आले आहे की भूतान आणि नेपाळमधून येणाऱ्या बिअरवर आयात शुल्क नाही आणि कस्टम ड्युटी देखील खूप कमी आहे. त्यामुळे नफ्याचे प्रमाण भारतीय ब्रँडपेक्षा बरेच जास्त आहे. दारूच्या दुकानांवर त्यांची उपलब्धता वाढण्यामागे हे देखील एक मोठे कारण मानले जाते. अशा परिस्थितीत इतर देशांमधून येणारी महागडी आयात केलेली बिअर दुकानांमधून गायब आहे.
परवाने नुतनीकरणामुळे सावध पवित्रा
काही दुकानदारांनी असेही सांगितले की दारू दुकानांचे परवाने संपत आहेत, म्हणून त्यांनी जास्त स्टॉक ऑर्डर केला नाही. सध्या जुना स्टॉक क्लिअर केला जात आहे. आता सर्व दुकानांचे परवाने नूतनीकरण झाले की लवकरच नवीन ऑर्डर दिली जाईल. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असा दावा करत आहेत की विभागाकडे सर्व ब्रँडच्या बिअर पुरेशा प्रमाणात आहेत. स्टॉकची कमतरता नाही. ऑर्डर मिळाल्यानंतर सर्व ब्रँडच्या बिअर लगेच उपलब्ध करून दिल्या जातील.