मनीष सिसोदियांनंतर KCR यांच्या मुलीचा नंबर, अटक होणार; भाजपा नेत्याचा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:58 IST2023-02-27T17:57:43+5:302023-02-27T17:58:48+5:30
अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर तेलंगणा भाजपाचे नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे.

मनीष सिसोदियांनंतर KCR यांच्या मुलीचा नंबर, अटक होणार; भाजपा नेत्याचा दावा!
नवी दिल्ली-
अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर तेलंगणा भाजपाचे नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. सिसोदिया यांच्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के.कविता यांना लवकरच अटक केली जाईल, असं विधान विवेक व्यंकटस्वामी यांनी केलं आहे.
"मद्य अबकारी कराच्या घोटाळ्यासंदर्भात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. के.कविता यांनाही लवकरच अटक केली जाईळ. पंजाब आणि गुजरात निवडणुकीवेळी के.कविता यांनी आम आदमी पक्षाला १५० कोटी रुपयांची मदत केली होती", असा आरोप भाजपा नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी केला आहे.
के.कविता यांच्याकडे मद्य कंपनीची हिस्सेदारी
सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात केसीआर यांच्या मुलीचं नाव घेतलं होतं. यात कविता यांच्या नावावर एका मद्य कंपनीत ६५ टक्के भागीदारी असल्याचा आरोप करण्यात आला होता. केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत विवेक यांनी आगामी काळात सत्ताधारी पक्ष तेलंगणातील आपलं अस्तित्व गमावून बसेल असा दावा केला आहे.
भाजप नेत्याने दावा केला की तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्ष जेव्हा लॉन्च झाला तेव्हा त्याच्याकडे निधी नव्हता. आता या पक्षाकडे देशातील सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त भांडवल जमा झाले आहे. हा पैसा कुठून आला, असा सवाल भाजप नेत्याने उपस्थित केला. केसीआर यांनी निवडणुकीदरम्यान दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, अशीही टीका व्यंकटस्वामी यांनी केली.