'मला पुन्हा माझ्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले', CM आतिशी यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:48 IST2025-01-07T17:47:39+5:302025-01-07T17:48:24+5:30

Delhi Election 2025 : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या आरोपांवर आता PWD विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

Delhi Election 2025: 'I was thrown out of the CM's official residence again', CM Atishi's big claim | 'मला पुन्हा माझ्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले', CM आतिशी यांचा गंभीर आरोप

'मला पुन्हा माझ्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले', CM आतिशी यांचा गंभीर आरोप

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारीला मतदान होईल, तर 8 फेब्रुवारीला निकाल लागेल. दरम्यान, आजच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री आतिशी मार्लेन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरादर निशाणा साधला. भाजपने मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर काढल्याचा आरोप आतिशी यांनी यावेळी केला आहे. 

दुसऱ्यांदा मला माझ्या निवासस्थानातून बाहेर काढले
सीएम आतिशी म्हणाल्या की, आज दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या घोषणेच्या आदल्या रात्री माझे अधिकृत निवासस्थान हिरावून घेतले. पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे वाटप रद्द करण्यात आले आहे. निवडून आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काढून घेतले जाते. तीन महिन्यांपूर्वीही त्यांनी असेच केले होते. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हाकलून देण्यात आले. 

मी दिल्लीतील लोकांच्या घरी राहीन
भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री आतिशी पुढे म्हणाल्या, ते आमची घरे हिसकावून घेऊ शकतात, पण दिल्लीतील लोकांसाठी काम करण्याची आमची इच्छाशक्ती हिरावून घेऊ शकत नाहीत. गरज पडली तर मी दिल्लीतील लोकांच्या घरात राहीन, पण काम थांबवणार नाही. आज त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हाकलून दिले, मी शपथ घेत आहे की, दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2100 रुपये मिळवून देईन, संजीवनी योजनेंतर्गत प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 18,000 रुपये दरमहा मोफत उपचार देईन.

पीडब्ल्यूडीने दिले स्पष्टीकरण 
पीडब्ल्यूडीने दिल्ली सरकारला पत्र पाठवून बंगल्याचे वाटप रद्द केले आहे. तसेच, आतिशी यांच्या आरोपांवर पीडब्ल्यूडीने सांगितले की, मुख्यमंत्री आतिशी यांना बाहेर काढले नाही. मूळात त्या कधी त्या बंगल्यात राहायला गेल्याच नाहीत. त्यांना यापूर्वीच 17 एबी मथुरा रोड येथे सरकारी निवासस्थान देण्यात आले आहे. दोन कारणांमुळे आतिशी यांच्याकडून बंगला परत घेण्यात आला आहे. पहिले, त्यांनी एका आठवड्याच्या आत घराचा ताबा घेणे गरजेचे होते, पण त्यांनी आतापर्यंत ताबा घेतला नाही, जे नियमांच्या विरोधात आहे.

दुसरे कारण म्हणजे, 6 फ्लॅग स्टाफ रोड बंगल्याची सीबीआय/ईडीकडून चौकशी सुरू आहे. कॅगने बंगल्याच्या बांधकामात भ्रष्टाचाराची पुष्टी केली आहे. आतिशी यांना घर वाटप करण्यात आले, तेव्हा एक अट टाकण्यात आली होती की, 6 फ्लॅग स्टाफ बंगल्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आतिशी यांना चौकशीत सहकार्य करावे लागेल. पण, आतिशी यांनी जाणूनबुजून घराचा ताबा घेतला नाही, जेणेकरून घर बंद राहिले आणि तपास यंत्रणा चौकशी करू शकणार नाहीत. 

संजय सिंह यांची टीका
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, तीन महिन्यांत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे. भाजपचा खोटारडेपणा उघड झाला पाहिजे. हे लोक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाबत रात्रंदिवस खोटं बोलत आहेत. 

बंगल्यावर 33 कोटी रुपये खर्च
एक दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपने बंगल्याच्या नूतनीकरणावरील खर्चावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॅगच्या अहवालाचा हवाला देत दावा केला की, बंगल्याच्या नूतनीकरणाची अंदाजे रक्कम सुमारे 8 कोटी रुपये होती, परंतु बांधकामावरील एकूण खर्च सुमारे 33 कोटी रुपये झाला आहे. बंगल्यात लावण्यात आलेल्या महागड्या वस्तूंबाबतही त्यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला. बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया योग्य पद्धतीने पाळली गेली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Web Title: Delhi Election 2025: 'I was thrown out of the CM's official residence again', CM Atishi's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.