मतदानादरम्यान दिल्लीत आप आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले, सिसोदियांसमोरच तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:25 IST2025-02-05T13:24:43+5:302025-02-05T13:25:08+5:30
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू असतानाच दिल्लीतील जंगपुरा येथे आप आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांच्यासमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.

मतदानादरम्यान दिल्लीत आप आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले, सिसोदियांसमोरच तुफान राडा
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचार कालावधीत राज्यातील सत्ताधारी आप आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्येही तणावाचं वातावरण असून, त्याचेच पडसाद आज मतदान सुरू असताना उमटले आहे. मतदान सुरू असतानाच दिल्लीतील जंगपुरा येथे आप आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांच्यासमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
दिल्लीतील जंगपुरा विधानसभा मतदारसंघात एका ठिकाणी पैसे वाटले जात असल्याची माहिची मिळाल्यानंतर मनिष सिसोदिया यांनी तिथे धाव घेतली होती. त्यानंतर तिथे भाजपा आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच येथे भाजाकडून पैसे वाटले जात होते, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झालं आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावला आहे.